वार्ताहर /माशेल
मुस्लीमवाडा येथे गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या बाजूला पार्क केले जाणारे ट्रक फोंडा वाहतूक पोलिसांनी हटविले. महामार्गाच्या बाजूने उभ्या केल्या जाणाऱया या ट्रकांमुळे रहदारी करणाऱया वाहनांना समोरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडले होते. वाहतूक निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी त्याकडे तातडीने लक्ष घातल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बेशिस्तपणे रस्त्याच्या बाजूला पार्क केल्या जाणाऱया या ट्रकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पंचायत तसेच माशेल पोलीस चौकीत करण्यात आली होती. मात्र त्याकडे कुणीही गांभिर्याने लक्ष दिले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी एक मोठा अपघात होऊन एक वाहन पार्क केलेल्या ट्रकवर आदळले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करताना बेशिस्त पार्किंगची ही बाब लक्षात घेतली नाही.
अखेर निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्यापर्यंत ही तक्रार पोचल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करुन हे ट्रक तेथून हटविले. दरम्यान बाणस्तारीच्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी दुचाकी व इतर वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्याने तेथील वाहतुकीत शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.









