यमुनोत्रीमध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडमध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग देवप्रयागनजीक तीन ठिकाणी भूस्खलन झाल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा दिसून येत आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने यात्रेकरू आणि स्थानिक लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
देवप्रयाग आणि मूल्यगावनजीक अतिवृष्टीमुळे पर्वतावरून दरड कोसळली आहे. वाहतूक ठप्प झाल्याने अत्यावश्यक सामग्रीचा पुरवठा बंद झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक यंत्रसामग्रीसह घटनास्थळी पोहोचले असून दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु पाऊस सातत्याने पडत असल्याने कामात अडथळे निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
कर्णप्रयागमध्ये रविवार रात्रीपासून अतिवृष्टी होत असून भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर पुनगाव येथे रस्ता खचल्याने वाहतूक रोखण्यात आली आहे.









