कुसमळी पर्यायी पूल पाण्याखाली जाण्याची भीती : जांबोटी-खानापूर मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून अवलंब
वार्ताहर/जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलाला पाण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.बेळगाव गोवा अंातरराज्य वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पर्यायी मार्ग म्हणून जांबोटी-खानापूर मार्गाचा वापर करण्याची प्रशासनाने सूचना केली आहे. बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावर कुसमळीनजीक मलप्रभा नदीवर 100 वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता. मात्र काळ मर्यादेनुसार सदर ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता.
या ठिकाणी नवीन पूल बांधावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्याची दखल घेऊन या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. जीर्ण व कमकुवत बनलेला ब्रिटिशकालीन पूल जानेवारी महिन्यात पाडवून त्या ठिकाणी नवीन पूल बांधकामाचे काम हाती घेण्यात आले असून सदर पुलाचे काम सध्या सुरू आहे. मलप्रभा नदीवरील पूल पाडल्यानंतर वाहतुकीसाठी बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाच्या शेजारी मातीचा भराव टाकून पर्यायी पूल उभारून वाहतुकीसाठी रस्ता करण्यात आला होता. या रस्त्यावरूनच बेळगाव-गोवा दरम्यानची वाहतूक गेल्या जानेवारी महिन्यापासून सुरळीत सुरू होती. मात्र जोरदार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यायी पुलाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने या पर्यायी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र गेल्या आठ दिवसांपासून या भागात मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडल्यामुळे मलप्रभा नदी प्रवाहित झाली आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या भागात मलप्रभा नदीवर लघु पाटबंधारे खात्याच्यावतीने देवाचीहट्टी, तोराळी, आमटे येथील ब्रिजकम बंधाऱ्यातील फळ्या काढल्याने अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन मलप्रभा नदी प्रवाहित झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह कुसमळी पुलापर्यंत आल्यामुळे मातीचा भराव टाकून तयार केलेल्या पर्यायी पुलाला धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील वाहतूक बंद केल्यामुळे बेळगाव-गोवा या ठिकाणी होणारी प्रवासी व माल वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांची गैरसाय होत आहे.
वास्तविक, बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील नवीन पुलाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाअंतर्गत 12 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पुलाचे काम नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्याची गरज होती. परंतु कंत्राटदाराने पुलाचे काम जानेवारी महिन्यापासून हाती घेतल्यामुळे इतक्या कमी कालावधीत पुलाचे काम पूर्ण करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. सध्या बांधकाम करण्यात येत असलेल्या या पुलाला एकूण सहा कमानी आहेत. त्यापैकी तीन कमानीवर स्लॅब घालण्यात आले आहे. अद्याप तीन कमानीवर स्लॅब घालण्याचे काम बाकी असून पुलाचे काम पूर्ण होण्यास अद्याप दीड-दोन महिने कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पर्यायी मार्ग उपलब्ध कऊन देण्याची मागणी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्ग रविवारपासून वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बेळगाव-गोवा ही वाहतूक जांबोटी-खानापूर मार्गे वळविण्यात आली आहे. या मार्गावर प्रवासी व माल वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी, जांबोटी-खानापूर रस्ता अरुंद व घाट वळणाचा आहे. त्यातच या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविताना अपघाताची शक्यताही वाढली आहे. बेळगाव-चोर्ला मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.









