रस्त्यावर चार फूट पाणी साचल्याने धोकादायक : तिनईघाट-मारसंगळमार्गे वाहतूक वळविली
वार्ताहर/रामनगर
अनमोड-रामनगर महामार्गावरील हत्तीब्रिज येथे चारफूट पाणी साचून राहिल्याने लहान वाहनांसाठी धोक्याचे असल्याने हा मार्ग बंद करून वाहने तिनईघाट, मारसंगळ-अनमोड यामार्गे वळविण्यात आली आहेत. एका समाजसेवकाने दिलेल्या जेसीबीद्वारे मार्गावर साचलेले पाणी काढून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु दोन्ही बाजूंनीही पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर माघारी फिरावे लागले.
बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. अखेर पोलिसांनी या ठिकाणी येऊन लहान वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळविले. मात्र तरीही अनेक वाहनधारक जीवाची पर्वा न करता या पाण्यातून वाट काढत होते. या पाण्यातून वाट काढताना एक बोलेरो पिकअप आणि एक ट्रॅक्टर कलंडला आहे. तसेच एक दुचाकीस्वारही या पाण्यातून जातेवेळी पडल्याने दुखापत झाली आहे.
यामुळे पोलिसांनी सध्या मारसंगळमार्गे लहान वाहने वळविली आहेत. सायंकाळी 6 वाजल्यानंतर वाहतुकीस बंदी असल्याने या मार्गावरून वाहनांना सोडण्यात येत नाही. त्यामुळे हत्तीब्रिज दुऊस्ती होईपर्यंत मारसंगळमार्गे लहान वाहनांना दिवस-रात्र सोडण्याची मागणी होत आहे. कर्नाटक राज्याच्या हद्दीत खराब रस्ता असला तरी गोवा परिवहन मंडळ, तसेच इतर वाहतुकीसाठी गोवा राज्यातूनही अनेक वाहने दररोज या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या समस्येवर कर्नाटक सरकारशी बोलणी करण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. सध्या हत्तीब्रिज येथेही एक मोठे वाहन अडकून पडल्याने सर्व बसेसना हा रस्ता बंद झाला आहे.









