मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : मेरशी जंक्शनवर वाहतूक प्रणालीचा शुभारंभ
पणजी : मेरशी जंक्शन येथे आर्टिशियल इंटेलिजन्स’ या नवीन वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थित केला. या यंत्रणेद्वारे येत्या 20 मार्चपासून ई-चलन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून ती स्वयंचलित तत्वावर आधारित आहे. याप्रसंगी डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सदर प्रणाली यंत्रणेचा वापर वाहतूक व्यवस्थापन तसेच सुरेक्षसाठी होणार आहे. वाहने कुठे ये-जा करतात, यावर सदर यंत्रणेच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार असून त्यासाठी रु. 40 लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तो खर्च कंपनीतर्फे चलने देऊन वसूल करण्यात येणार असून त्यातील 70 टक्के वाटा कंपनीला तर 30 टक्के वाटा राज्याला मिळणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. वाहतूकमंत्री गुदिन्हो म्हणाले की, ‘ब्रेलटेक अल’ या खासगी कंपनीतर्फे सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून मेरशी जंक्सशनवर तिचा प्रायोगिक तत्वावर वापर सरू करण्यात आला आहे. सध्या गोव्यातील रस्त्यावर चालू असलेली सिग्नल यंत्रणा मागे पडली असून ती योग्य पद्धतीने चालत नाही. आता नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सिग्नल यंत्रणा साकारून वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे. गोव्यातील वाढती वाहने, अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा साकारण्यात आली असल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले. मेरशी जंक्शन हा वाहनांच्या गर्दीचा एक प्रमुख टप्पा असून तेथे ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी एकूण 16 कॅमेरे लावण्यात आले असून स्वयंचलित माध्यमातून ई-चलन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मेरशी जंक्शनजवळ हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सदर यंत्रणा प्रणाली राज्यातील वाहतुकीची गर्दी होणाऱ्या इतर ठिकाणी वापरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.









