महानगरपालिका-रहदारी खात्याने पार्किंग नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असून, पार्किंगची समस्या भेडसावत आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पार्क करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी बाजारपेठेसह फोर्ट रोड परिसरात वाहतूक कोंडी झाली.
गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. कोरोनाच्या प्रसारामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी अथवा फिरण्यासाठी बंदी होती. परिणामी नागरिकांना आपल्या उत्साहाला बंधने घालून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा लागला. मात्र यंदा सर्व निर्बंध मागे घेण्यात आल्याने गणेशोत्सव धुमधडाक्मयात साजरा करण्याचा प्रत्येकाने निर्धार केला आहे. त्यामुळे खरेदीसाठी शहरात गर्दी वाढत असून प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. शहरात पार्किंगसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने बाजारपेठेतील रस्त्यांशेजारी वाहने पार्क केली जातात.
बाजारपेठेत खरेदीसाठी ग्रामीण भागासह परराज्यातील भाविक येत असतात. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रत्येक गल्लीत रस्त्याशेजारी अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क करण्यात येत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.
आणखी गर्दी वाढण्याची शक्मयता…
गणेशोत्सव आठ दिवसांवर येवून ठेपल्याने बुधवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठेसह फोर्ट रोड, खडेबाजार, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, कचेरी रोड आदींसह विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वाहने अडकून पडल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बाजारपेठेत आणखी गर्दी वाढण्याची शक्मयता असून महापालिका आणि रहदारी खात्याने पार्किंग नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.









