प्रतिनिधी/मडगाव
वाहनांच्या ऐवजी लोकांसाठी नवीन जुवारी पूल खुला केल्याने सद्या जुन्या जुवारी पुलाच्या दोन्ही बाजूंनी भयानक ट्रफिक जॅम होत असून हजारो प्रवासी अडकून पडू लागले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन जुवारी पूल जनतेसाठी खुला. त्यामुळे नव्या पुलावर जाण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक आपली वाहने घेऊन येत असल्याने टॅफिक जॅम होण्याचे प्रकार वाढले आहेत.
या टॅफिक जॅम मध्ये रूग्णवाहिका देखील अडकून पडू लागल्या आहेत. तर अनेकांना दाबोळी विमानतळावर विमाने चुकण्या बरोबरच रेल गाडय़ा देखील चुकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. जुन्या जुवारी पुलाच्या दोन्ही बाजूनी वाहने अडकून पडण्याचे प्रकार दररोजचे झालेले आहे. त्यात भर म्हणून नवीन जुवारी पूल लोकांना खुल्या केल्यापासून या समस्येत भर पडली आहे. नवीन पुलावर येऊन सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आलेला नाही. मोठय़ा संख्येने लोक नवीन पुलावर येत असून आपली वाहने रस्त्याच्या बाजूला मन मानेल तशी पार्क करून पुलावर सेल्फी घेण्यासाठी जातात. त्यामुळे भयानक ट्रफिक जॅम होऊ लागला आहे.
अगोदर पूल खुला करा नंतर उद्घाटन करा
सद्या जुन्या जुवारी पुलाच्या दोन्ही बाजूनी वाहनाची होत असलेली कोंडी पहाता, अगोदर नवा जुवारी पूल वाहतुकीसाठी खुला करावा व नंतर सरकारने यथा सावकाश या पुलाचे भव्य स्वरूपात उद्घाटन करावे अशा प्रतिक्रीया व्यक्त होऊ लागल्या आहेत. सद्याच्या परिस्थितीत मडगावहून पणजी व पणजीहून मडगाव-वास्कोला जाणे म्हणजे एक मोठे दिव्य पार केल्यासारखी लोकांची परिस्थिती होत आहे. या वाहतूक कोंडीवर, वाहतूक पोलीस देखील उपाय काढू शकत नाही. पोलीस यंत्रणा पूर्णपणे हतबल झालेली आहे.
या भयानक ट्रफिक जॅम मध्ये अनेक अपघाताची नोंद होऊ लागली असून पोलिसांना पंचनामा करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. नवीन जुवारी पुल खुला करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मान्यता दिलेली आहे. मात्र, केवळ व्हीआयपीच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करायचे असल्याने सदय़ा लोकांचे हाल होऊ लागले आहेत. या हालातून सुटका करा अशा प्रतिक्रीया सर्रासपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत.









