वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजन करण्याची गरज
बेळगाव : वाहतुकीची कोंडी ही बेळगावकरांना नेहमीचीच डोकेदुखी ठरत आहे. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. आता सर्वात जास्त डोकेदुखी म्हणजे किल्ल्याजवळील अशोक सर्कल हे ठरू लागले आहे. राज्याबरोबरच परराज्यातून येणाऱ्या बसेस याचबरोबर शहरातून बाहेर पडणारी वाहने या सर्कलमधूनच जात असतात. त्यामुळे दररोज या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक अक्षरश: कंटाळले असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाला जिल्ह्याबरोबरच परराज्यातून बस व इतर वाहने येत असतात. एकप्रकारे शहराचे हे मुख्य प्रवेशद्वारच आहे. मात्र या ठिकाणी एकाचवेळी वाहने बाहेर पडल्यानंतर वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर या ठिकाणी सरकारी विश्रामधामही आहे. त्यामुळे महनीय व्यक्तीही येत असतात. त्यांच्यासाठी बऱ्याचवेळा वाहतूक अडविली जाते. त्यानंतर वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी काही वेळा तास ते दीड तास तशीच राहते. त्यामुळे वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर याचबरोबर आरटीओ आणि कणबर्गी व सांबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांबचलांब रांगा लागत आहेत. या ठिकाणी रहदारी नियंत्रण करण्यासाठी सिग्नल आहे. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. वाहनांच्या रांगा लांबचलांब लागत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना त्याचा मोठा त्रास होत आहे. मंगळवारी तर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. यातच जोरदार पाऊसही सुरू होता. त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला. तेव्हा येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.









