प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरामध्ये एल अँड टी कंपनीकडून जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. सध्या रामघाट रोडवर जलवाहिन्या घातल्या जात असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. धर्मवीर संभाजी चौक, यंदे खूट येथून रामघाटमार्गे नागरिक गणेशपूरला पोहोचतात. परंतु, रस्त्यामध्येच ट्रक लावून माती भरण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
बेळगाव शहर तसेच उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीकडे सोपविण्यात आली. महानगरपालिकेसोबतच कॅन्टोन्मेंट परिसरातही जलवाहिन्या घातल्या जाणार होत्या. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डने जलवाहिन्या घालण्यास एल अँड टी कंपनीला प्रथमत: परवानगी दिली नाही. वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळताच कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील कामाला सुरुवात झाली.
कॅम्प परिसरात जलवाहिन्या घालण्यात आल्यानंतर आता रामघाट रोडवर वाहिन्या घातल्या जात आहेत. मोठ्या वाहिन्या असल्याने त्या जोडण्यास बराच वेळ लागत आहे. त्यामुळे हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.









