जिल्हाधिकारी, न्यायालय परिसरातील स्थिती
बेळगाव : जिल्हाधिकारी व न्यायालया-नजीकच्या आरटीओकडून राणी चन्नम्मा सर्कलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भरपावसात ट्रॅफिक जाम झाल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी सकाळपासूनच शहरात मुसळधार पाऊस होता. यामुळे काहीशी नागरिकांची तारांबळ उडाली. पण एवढ्या पावसातही मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत होते. जिल्हाधिकारी कार्यालय बसस्थानकापासून ते मराठा मंडळ संस्थेपर्यंत वाहने थांबली होती. पावसातच ट्रॅफिक जाम झाल्याने नागरिकांना दुहेरी समस्यांचा सामना करावा लागला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात न्यायालय, उपनोंदणी कार्यालय, ता. पं., जि. पं. सह विविध कार्यालये आहेत. यामुळे शेकडो नागरिक आपल्या समस्या घेऊन याठिकाणी येत असतात. या परिसरात सदैव वर्दळ असते. यातच मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने अनेक पायी जाणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांना समस्या निर्माण झाल्या होत्या. या ट्रॅफिकचा वकिलांसह सरकारी कामे आटोपण्यासाठी आलेल्या नागरिकांना फटका बसला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नागरिक अस्तावस्त आपली वाहने पार्क करून कामे आवरण्यासाठी जातात. याचा परिणामही ट्रॅफिक जामवर झाला. पोलिसांनाही ट्रॅफिक कमी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यामुळे नागरिकांनी आपली वाहने इतर नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होणार नाही, या पद्धतीने पार्क करावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होते.









