अधिकाऱ्यांनी भररस्त्यात वाहन थांबविल्याने नाराजी
बेळगाव : वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभाग पोलिसांकडून केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करून पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. असे असताना एका जबाबदार अधिकाऱ्यांकडून भररस्त्यावर वाहन थांबविल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची घटना सोमवारी कचेरी रोडवर घडली. कचेरी रोड हा रस्ता मुळातच अरुंद आहे. एक बाजूला वाहने पार्किंग करण्यात आली होती. तालुका तहसीलदारांचे वाहन कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर उभे केले होते. गांधी जयंतीनिमित्त सुटी असताना रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. मोजकीच वाहने रस्त्याच्या बाजूला पार्किंग करण्यात आली होती. जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारात तहसीलदारांचे वाहन उभे करण्यात आले होते.
एका बाजूला पार्किंगची वाहने दुसऱ्या बाजूला तहसीलदारांचे वाहन, यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. मागून आलेल्या वाहनचालकांकडून जोरजोरात हॉर्न वाजविण्यात येत होते. मात्र तहसीलदारांच्या वाहनामध्ये चालक नव्हता. यामुळे वाहनधारकांना बराचवेळ वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. एका जबाबदार अधिकाऱ्यांकडून अशी कृती होणे अपेक्षित नाही, अशी प्रतिक्रिया वाहनधारकांतून व्यक्त केली जात होती.









