नागरिक-वाहनधारक त्रस्त : नित्याची बाब असूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
वार्ताहर/येळ्ळूर
वाढती रहदारी आणि बेशिस्त वाहन पार्किंगमुळे छ. शिवाजी रोड येळ्ळूरवर वाहतुकीची कोंडी ही आता नित्याची बाब झाली असून नागरिक व वाहनधारक मात्र त्रस्त झाले आहेत. याच रस्त्यावरून यरमाळ, अवचारहट्टी, सुळगा, देसूर, राजहंसगड, नंदीहळ्ळी या गावांचीही वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एखादे अवजड वाहन समोरून आले किंवा दोन मोठी वाहने समोरासमोर आली की रस्ता ब्लॉक होतो. त्यामुळे वाहतूक थांबून वाहनाच्या रांगा लागतात. अशातच 200 फुटी रस्त्यावर भर टाकण्यासाठी मातीचे डंपरही याच रस्त्यावरून सुरू आहेत.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्की गटारे बांधली असून दुकानचालकांनी आपल्या सोयीनुसार गटारीची उंची वाढवल्यामुळे रस्ता अरूंद झाला आहेच. पण वाहने पार्किंग करताना निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. दुकानचालकांनी थोडीफार पार्किंगची सोय ठेवणे बंधनकारक केले पाहिजे. दाटीवाटीने असलेली दुकाने यामुळे हा रोड म्हणजे बाजारपेठ झाला असल्याने वाहनांबरोबर ग्रामस्थांचाही वावर मोठ्या प्रमाणात असतो. शिवाय शाळकरी मुलेही याच रोडवरून ये-जा करीत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून रोडवरील दोन्ही बाजुची अडचण दूर करीत ग्रामपंचायतीने वाहतूक सुरळीत करावी, आाr मागणी वाहनधारकांसह ग्रामस्थ करीत आहेत.









