शिवाजी चौकात तातडीने वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
सावंतवाडी \ प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या जाणवत आहे. विशेषतः शहरातील मध्यवर्ती असलेला शिवाजी चौक आणि एस.टी. स्टँड परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पर्यटक आणि मुंबईहून कोकणात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिवाजी चौकात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महत्त्वाच्या चौकात पूर्वी नियमितपणे वाहतूक पोलीस तैनात असायचे, मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांची नियुक्ती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक जाम होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून शिवाजी चौक आणि एस.टी. स्टँड परिसरात दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. वाहतूक पोलिसांची नियुक्ती झाल्यास रस्त्यांवरील वाहनांची व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.









