धेंपोचे जुने घर ते आझाद मैदानापर्यंतचा रस्ता खुला करण्याची मागणी
वार्ताहर /पणजी
येथील 18 जून रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून मार्केट परिसरातून धेंपोच्या जुन्या घराला वळसा घालून येणारी वाहने सरस्वती मंदिर टायटन शोरुमजवळ बराचवेळ कोंडीत सापडतात. ही समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांसाठी धेंपोचे जुने घर ते आझाद मैदानापर्यंतचा रस्ता खुला करावा, अशी मागणी पणजीवासीय वाहनचालकांनी केली आहे.
नववर्ष साजरे करण्यासाठी राज्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटक आपल्या वाहनासह दाखल झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात खोदाई कामासाठी बऱयाच रस्त्यावर अडथळे निर्माण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. येथील सरस्वती मंदिर इमारत परिसर, श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातून जाणारा रस्ता तसेच जुन्या नॅशनल टॉकीज पर्यंतचा रस्ता गेले कित्येक दिवसापासून बांधकामामुळे लोखंडी पत्रे टाकून बंद ठेवला आहे. चर्च परिसरातून आल्तीनो, कोर्तीन, बस स्थानक, बोक द क्हॉक, मळा अशा विविध ठिकाणी वाहन चालकांना जाण्यासाठी सरस्वती मंदिर इमारत पर्यंत येऊन 18 जून रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना 18 जून रस्त्यावरील वाहतुकीच्या वर्दळीमुळे रस्ताच पार करता येत नसल्याने वाहनचालकांची डोकेदुखी ठरली आहे. सदर सस्त्यावरील समस्या सोडविण्यासाठी धेंपोचे घर ते आझाद मैदानावरील रस्ता खुला केल्यास बरीचशी वाहतुकीची समस्या सुटणार आहे, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.









