जलवाहिन्यांचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : गुड्सशेड रोड गोवावेस परिसरात मागील काही दिवसांपासून जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. यामुळे गोवावेस येथे एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे गोवावेस येथील मराठा मंदिर कॉर्नर येथे वाहतुकीची कोंडी होत असून हे काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे. शहरातील अनेक भागात एलअँडटी कंपनीकडून जलवाहिन्या घातल्या जात आहेत. गुड्सशेड रोड येथील डेक्कन हॉस्पिटलपासून मराठा मंदिर कॉर्नरपयर्तिं जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. परंतु, हे काम कासवगतीने सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे गुड्सशेड रोड येथील नागरिकांना शिवाजी गार्डनमार्गे घरी यावे लागत होते. सध्या या रस्त्यामधून जलवाहिनी घातल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मराठा मंदिर कॉर्नर येथील हनुमान मंदिरासमोर जलवाहिनी घालण्याचे काम सुरू केल्याने एका बाजूचा मार्ग बंद केला आहे. यामुळे एकाच मार्गाने वाहतूक सुरू आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. नव्याने केलेला काँक्रीटचा रोड फोडून जलवाहिनी घातल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. हे काम लवकर पूर्ण करून रस्ता खुला करण्याची मागणी केली जात आहे.









