काकतीवेस-न्यायालयापर्यंतच्या रस्त्यावर सततच्या वर्दळीमुळे डोकेदुखी
बेळगाव : नागरिक आपल्या विविध कामांसाठी सरकारी कार्यालय व न्यायालय परिसरात येत असतात. यामुळे काकतीवेस ते न्यायालयापर्यंतच्या रस्त्यावर सततची वर्दळ असते. शुक्रवारी दुपारी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निवेदन देण्यासाठी नागरिक आंदोलनाद्वारे येत असतात. तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी नागरिकांची गर्दी असते. त्याचबरोबर जिल्हा पंचायत कार्यालयात सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी येत असतात.
काहीवेळा सरकारी कार्यालयामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचेही आयोजन करण्यात येत असते. यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होऊन अधिकाऱ्यांसह नागरिकांचीही सतत वर्दळ असते. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याने विविध खात्याचे अधिकारी पोहोचले होते. रस्ता अरुंद असूनही रस्त्यावरच वाहनांची पार्किंग करण्यात आली होती. यामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण झाला होता. सदर मार्गावरील पार्किंग व्यवस्थेवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.









