दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा : जेसीबीने मातीचा ढिगारा हटविला

प्रतिनिधी /धारबांदोडा
रविवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनमोड घाटात गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दरड कोसळल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास येथील दूधसागर देवस्थानाजवळ मोले चेकनाक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला. तोपर्यंत कर्नाटक व गोव्याच्या बाजूने अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या घटनेची माहिती मिळताच धारबांदोडा तालुक्याचे मामलेदार प्रवीणजय पंडित व कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेऊन रस्ता विभागाच्या मदतीने मातीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. सतत कोसळणाऱया पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. डोंगर कडा कोसळताना काही झाडेही उन्मळून पडल्याने ती बाजूला काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.
गोवा-बेळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. तीन वर्षांपासून या मार्गावरील प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घातल्याने रहदारी कमीच असते. तरीही कर्नाटकातून गोव्यात येणारी वाहने अनमोड मार्गाचाच वापर करतात. दरड कोसळल्यानंतर मोले चेकनाक्यावर वाहतूक अडविली होती. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, तेथे संरक्षक भिंत उभारली होती. त्याच जागेत पुन्हा आणखी एक छोटी दरड कोसळली आहे.









