खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने अडथळा
बेळगाव : गोगटे सर्कल येथे विद्युतवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आठवडाभरापासून खोदाई करून ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असून दुरुस्ती करणे शक्य होत नसल्याने विलंब होत आहे. परंतु, यामुळे गोगटे सर्कल परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉमच्या विद्युत केंद्रातून उद्यमबाग येथील केंद्राला वीजपुरवठा करण्यासाठी 33 केव्हीए क्षमतेची भूमिगत विद्युतवाहिनी घालण्यात आली आहे. या विद्युतवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने आठ दिवसांपूर्वी खोदाई करण्यात आली.
गोगटे सर्कलच्या मध्यभागी खोदाई करण्यात आली असून बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दुरुस्तीचे काम करताना पावसाच्या पाण्याचा अडसर होत असल्याने काम लांबणीवर पडत आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारले असता पाण्यामुळे दुरुस्ती करणे अशक्य होत आहे. त्यामुळे पाणी सुकल्यानंतर दुरुस्ती शक्य होईल. अद्याप आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परंतु, यामुळे वाहनचालकांना मात्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषत: सकाळी व सायंकाळी गोगटे सर्कल येथे गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम वेळेत संपविण्याची मागणी होत आहे.









