बेळगाव : शहर परिसरात विविध कामांसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. काम संथगतीने होत असल्याने खड्ड्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आरटीओ कार्यालयानजीक मोठा खड्डा खोदण्यात आल्याने वाहनधारकांना वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी काहीवेळा वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागल्याचे दिसून आले.
आरटीओ कार्यालयसमोरील मार्ग शहरातील मुख्य मार्गापैकी एक आहे. या मार्गावरून मध्यवर्ती बसस्थानक, सांबरा विमानतळ, शाळा व महाविद्यालय, मिलिटरी कँटीन, सरकारी कार्यालय व किल्ला तलावासाठी जाण्यासाठी हजारो नागरिकांची दररोज ये-जा असते. या मुख्य मार्गावर विकासकामांच्या नावाखाली खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र काम अद्याप पूर्ण न झाल्याने खड्ड्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे याचा प्रवाशांवर परिणाम होत असून संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
आरटीओ कार्यालयासमोरील बसस्थानकाशेजारील रस्त्यावर मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. सदर खड्डा रस्त्याच्या मध्यभागापर्यंत खोदण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे वाहतूक कोंडीही होत असून वाहनधारकांना वाहने चालवताना समस्या होत आहे. लवकरात लवकर काम संपवून खड्डा बुजवण्याची आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून त्वरित रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.









