अनगोळ नाक्यापासून खानापूर रोडवर जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई केल्याने समस्या : रस्त्यावर मातीचा ढिगारा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनगोळ नाक्मयापासून खानापूर रोडवर जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. ऐन पावसात खोदाईचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर रोडवर चिखल निर्माण झाला आहे. तसेच मंगळवारी टिळकवाडी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.
सध्या 10 वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा केला जातो. उर्वरित 48 वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आले असून मुख्य जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनगोळ नाका परिसरात जलकुंभ उभारण्यात येत असून त्याठिकाणी पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने अनगोळ नाक्मयापासून जलवाहिनी घालण्यात येत आहे. खानापूर रोडशेजारी ऐन पावसातच खोदाई करून जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. परिणामी काही ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
खबरदारी घेऊन काम करा
मागील आठवडय़ात आरपीडी चौकात जलवाहिन्या घालताना देशमुख रोडची वाहतूक बंद झाली होती. मंगळवारी गोवावेसकडे जाणाऱया रस्त्यावर जलवाहिन्या घालण्यात येत असताना या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. या ठिकाणी निम्म्या रस्त्यावर मातीचा ढिगारा पडला होता. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली. तसेच काही ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना देखील अडचणींचे ठरत आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचण होणार नाही. याची खबरदारी घेवून जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.