रस्त्यावरच थांबल्याने रायबंदर – पणजी रस्ता झाला बंद : वकील मुख्यमंत्री भेटीनंतर चार पोलीस निलंबित : भेदभाव न करता चौकशीची कुटुंबीयांची मागणी : अड. गजानन सावंत यांना पोलिसांकडून मारहाण
प्रतिनिधी / पणजी
अड. गजानन सावंत मारहाण प्रकरणातील संशयित पोलिसांना अटक करा, अशी मागणी करीत वकील संघटनेने मंगळवारी रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) मोर्चा नेला. सीआयडी निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी कायद्यावर बोट ठेवत अटक करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी त्यांच्या विरोधात एकही पुरावा नसल्याचे राजू राऊत देसाई यांनी वकीलांच्या शिष्टमंडळाला सांगितले.
राज्यभरातील वकील काल मंगळवारी सायंकाळी रायबंदर येथील सीआयडी कार्यालयासमोर जमले होते. अधिकाधिक वकीलांची वाहने चारचाकी असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्त्याच्या एका बाजूने वाहने पार्क करून दुसऱ्या बाजूने म्हणजे सीआयडी कार्यालयाच्या दिशेने जात असताना वाहतूक ठप्प झाली होती. काही वाहनचालकांनी इतरांना कायदा शिकविणारे वकील स्वत: कायदा मोडतात का, असे सडेतोडपणे विचारून वकीलांशी हुज्जतही घातली.
पोलिसांना अटक करणे शक्य नाही
मोठ्या संख्येने आलेल्या वकीलांनी सीआयडी कार्यालयाच्या गेटचा मुख्य दरवाजा ओलांडल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडविले. त्यामुळे ते एकाही कार्यालयात जाऊ शकले नाही. वकिलांच्या शिष्टमंडळाने सीआयडीचे निरीक्षक राजू राऊत देसाई यांची भेट घेतली आणि पोलिसांना अटक करण्याची मागणी केली. मात्र हा गुन्हा केवळ तक्रारीवर दाखल करण्यात आला असून अद्याप पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी पोलिसांना अटक करणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चारही पोलीस निलंबित
वकील संघटनेने रायबंदरवरून थेट पणजी गाठली आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पोलिसांना अटक करून निलंबित करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली. वकिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर सरकारने कारवाई करून चार पोलिसांना निलंबित केले. त्यात हवालदार संदीप परब, कॉन्स्टेबल महादेव नाईक, अमृत नागवेकर व कॉन्स्टेबल चालक मार्कूस गोम्स यांचा समावेश आहे.
भेदभाव न करता चौकशी व्हावी
अॅड. गजानन मारहाण प्रकरणातील पोलिसांच्या नातेवाईक व अन्य काही लोकांनी पोलीस महासंचालक जसपाल सिंग व पोलीस महानिरीक्षक ओमविर सिंग यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. पोलीस आपली ड्यूटी करीत असताना वकील गजानन सावंत यांनी अगोदर एका पोलिसाला मारहाण केली. त्यामुळे सारा प्रकार निर्माण झाला. या साऱ्या प्रकरणाची कोणताही भेदभाव न करता चौकशी व्हावी अशी मागणी पोलिसांच्या नातेवाईकांनी केली आहे.
यावेळी श्रृती परब, सावियो पिंटो यांच्यासह पोलिसांचे 15 नातेवाईक उपस्थित होते. पोलीस रात्रंदिवस ड्युटी बजावत असतात, मात्र त्यांच्यामागे कोणतीही संघटना नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी पोलिसांना बळी केले जाते. दोन दिवसांपूर्वी झालेली घटनाही तोच प्रकार आहे. हे पोलीस वरिष्ठांच्या आदेशावरूनच आपली ड्युटी बजावण्यासाठी गेले होते. त्यांना मारहाण केली जाते याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे, असे पोलिसांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
वकील गजानन सावंत यांनी एका पोलिसावर हल्ला केला आणि ते पळून जात असताना खाली पडले. त्यात त्यांना दुखापत झाली, त्याचे खापर पोलिसांच्या डोक्यावर का मारले जाते. प्रत्येकवेळी पोलिसांचा बळी देण्यापेक्षा कधीतरी पोलिसांची बाजू समजून घ्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान या हल्लाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती गोवा अॅडव्होकेट बार असोसिएशनने न्यायालयात केली आहे. या प्रकरणी नीट चौकशी होत नाही, न्याय मिळणे कठीण आहे, असेही असोसिएशनने विनंतीत म्हटले आहे.









