शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांवर अस्ताव्यस्त पार्किंग : वाहतुकीला शिस्त आवश्यक : ट्रिपल सीट ये-जा करणाऱ्या तरुणाईला वाहतूक पोलिसांनी आवरणे गरजेचे
बेळगाव : जेथे पहावे तेथे सर्वच वर्दळीच्या रस्त्यांवर अस्ताव्यस्त पार्क केलेली वाहने, ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, बंद पडलेले सिग्नल आणि कोठेही अडवून कधी हेल्मेटसाठी, कधी अधिकृत कागदपत्रांसाठी अडवणारे वाहतूक पोलीस या सर्वांचा सामना करताना बेळगावकर अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. मुख्य म्हणजे दिवसेंदिवस या समस्यांमध्ये भर पडत आहे. आणि उपाय मात्र कोणताच होत नाही हे दुर्दैव आहे.बेळगावची वाहतूक समस्या गंभीर होत चालली आहे. त्यावर वेळीच उपाययोजना झाली नाही तर ती उग्र स्वरुप धारण करेल यात शंका नाही. जागा कमी, वाहने अधिक हे चित्र नेहमीचेच आहे. मूळात शहरातील बहुसंख्य रस्ते अरुंद आहेत. प्रत्येक घरी एक ते दोन दुचाकी आहेतच. शिवाय चारचाकी गाड्यांची संख्या वाढत आहेच. इमारती बांधताना पार्किंगसाठी जागा सोडण्याच्या नियमांचे काटेकोर पालन झालेले नाही. याची उदाहरणे शहरात सर्वत्र आहेत.
प्रश्न हा आहे, या सर्वांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा विचार कोण करणार? वाहतुकीच्या नियमांचे पूर्ण उल्लंघन करून एकेरी वाहतूक असूनही तेथूनच वाहन दामटणारे तरुण बेदरकार झाले आहेत. रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड याठिकाणी वारंवार त्याचे प्रत्यंतर येते. दुर्दैवाने खडेबाजार, रामदेव गल्ली येथून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडविण्यासाठी पोलीसच नसतात. शहरातील बहुसंख्य अंतर्गत भागांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे क्षणोक्षणी उल्लंघन होत आहे. मात्र महत्त्वाच्या वर्दळीच्या चौकातच पोलीस अडकून असल्याने इतरत्र म्हणजेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये नियम उल्लंघन करणाऱ्यांना आवरण्यास कोणीच नसतात. त्यामुळे या तरुणांचे फावते आहे.
हीच गोष्ट ट्रिपल सीटची, अलीकडे बहुसंख्य दुचाकीवर तीन आणि कधी कधी चार तरुण बसलेले पाहायला मिळतात. शिवाय हेल्मेट परिधान करणे म्हणजे त्यांच्या आत्मसन्माला धक्काच पोहोचणे असे त्यांना वाटते. हे तरुण गर्दीतून आणि प्रामुख्याने पोलिसांना चुकविण्यासाठी भरधाव वेगाने वेड्यावाकड्या पद्धतीने वाहने चालवितात. पोलिसांनी हेल्मेट सक्ती करणे व विना हेल्मेट वाहन चालकावर कारवाई करणे ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु केवळ तेवढेच वाहतूक पोलिसांचे काम नाही. कधी कधी शहरात सर्वत्र फेरफटका मारुन वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम त्यांनी करायला हवे. मुख्य म्हणजे ट्रिपल सीट वाहनचालकांना त्वरित आवरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास हे प्रमाण काहीअंशी तरी कमी होईल.
चालणाऱ्या माणसांनाच वाहनांच्या गर्दीमध्ये थांबून राहण्याची वेळ
शहरातील रस्त्यांबाबत काही न बोललेलेच बरे.परंतु दुर्दैवाने या सर्व समस्यांना ज्याचा काहीही दोष नाही अशा सर्वसामान्य माणसाला सामोरे जावे लागते आहेत. या शहरात वाहनांची इतकी संख्या वाढली आहे की, चालणाऱ्या माणसांनाच वाहनांच्या गर्दीमध्ये थांबून राहण्याची वेळ येते. केवळ दुचाकी वाहनांची तपासणी करणे यावरच लक्ष केंद्रीत न करता वाहतूक पोलीस विभागाने या समस्यांची दखल घेऊन वाहतुकीला शिस्त लावणे, ट्रिपल सीट ये-जा करणाऱ्या तरुणाईला आवरणे यावरही लक्ष दिल्यास बेळगावकरांना काहीअंशी दिलासा मिळेल. प्रशासन आणि वाहतूक पोलीस हा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा करावी का?
शहरातील सिग्नल यंत्रणा कोलमडली
शहरातील सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. तीन ते चार महिन्याहून अधिक काळ लोटला तरी यंदे खूट येथील सिग्नल यंत्रणा अद्याप सुरू झालेली नाही. वास्तविक हा इतका महत्त्वाचा चौक आहे की तेथून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. याच मार्गावरून विद्यार्थी शाळा-कॉलेजना जातात. त्यांच्या ये-जा करण्याच्या वेळेला प्रामुख्याने सकाळी वाहतूक पोलीस नसल्याने येथे सतत वाहनांची कोंडी होते.










