खेड :
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट व वरंधा घाटातील वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत. अतिवृष्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीची मुभा देण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाटातील मार्गावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना अटकाव करण्यात आला होता. पावसाळ्यात ऑरेज आणि रेड अलर्ट असताना हलक्या वाहनांवरही बंदी घालण्यात आली होती. तसेच रात्रीच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः थोपवण्यात आली होती. यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे सूचित करण्यात आले होते. राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने घाटरस्त्यावरील सुधारणा व मजबुतीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.
ढिगारे हटवणे, अडथळे दूर करणे आणि रस्ता प्रवासासाठी सुरक्षित बनवण्याची कामे पूर्ण झाल्याने मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आंबेनळी घाट आणि वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला केला आहे. अतिवृष्टीच्या दिवसात मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश देत स्थानिक पोलीस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही पारित केले आहेत. यामुळे दोन्ही घाटातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून मनस्तापातून सुटका झाली आहे.








