बेळगाव : शहरात जलवाहिन्या घालण्यासाठी ठिकठिकाणी करण्यात आलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काँग्रेस रोड कॉर्नर ते चन्नम्मानगर रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला असल्याने वाहने चालविणेही अवघड झाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस रोड ते चन्नम्मानगर कॉर्नरपर्यंत खोदाई करण्यात आली होती तर चन्नम्मानगरच्या अंतर्गत भागात चार ते पाच महिन्यांपूर्वी जलवाहिन्यासाठी खोदाई करण्यात आली होती.
यावेळी मोठ्या प्रमाणात माती काढण्यात आली होती. जलवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात भराव घालण्यात आला. परंतु हा भराव सध्या खचल्याने रस्ता येण्या जाण्यास धोकादायक ठरत आहे. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असून यातूनच वाट काढत नागरिक ये-जा करीत आहेत. रात्रीच्यावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. चिखलामध्ये वाहने अडकून वाहनचालक जायबंदी होत आहेत. यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. महापालिका, एलअँडटी प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.









