शहर परिसरातील स्थिती : माती तातडीने हटविण्याची मागणी
बेळगाव : ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीसाठी शहर आणि उपनगरात जिकडे तिकडे खोदकाम करण्यात आले आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणची माती तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. शहर आणि उपनगरात घालण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन अत्यंत जुन्या असून दरवर्षी रस्त्यांवर काँक्रीट तसेच डांबरीकरण केले जात असल्याने ड्रेनेजवरील झाकणे खाली गेली आहेत. त्यामुळे ड्रेनेजची दुरुस्ती करताना समस्या निर्माण होत असल्याने ड्रेनेजवर नवीन झाकणे घालून त्यांची उंची वाढविली जात आहे. शहर व उपनगरात झाकणे घालून उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले असून माती ड्रेनेजच्या भोवती टाकण्यात आली आहे. चार दिवसांपासून ड्रेनेजसाठी खोदलेली माती तशीच पडून असल्याने याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. खडेबाजार, माळी गल्ली यासह काही ठिकाणच्या ड्रेनेजच्या झाकणांची उंची वाढविण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने ड्रेनेजभोवती टाकलेली माती हटविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.









