बेळगाव : 24 तास पाणी पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या खोदाई कामामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. आनंदनगर कॉर्नर, वडगाव-येळ्ळूर मार्गावर 24 तास पाण्यासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. आधीच रस्ता अरूंद असल्याने त्यातच खोदाई करण्यात आल्याने येथून ये-जा करणे त्रासदायक ठरू लागले आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून 2026 पर्यंत शहराला 24 तास पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खोदाई आणि घरोघरी नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामामुळे शहरातंर्गत वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. सद्यस्थितीत शहरातील काकतीवेस रोड, रिसालदार गल्ली यासह इतर ठिकाणी खोदाईचे काम सुरू आहे. त्याबरोबर वडगाव परिसरातील येळ्ळूर रोड व इतर ठिकाणी काम हाती घेतले आहे.
माती, दगड रस्त्यावरच : वाहतुकीचा प्रश्न बिकट
मात्र या कामामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: अवजड वाहनांना ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. खोदाई केलेल्या ठिकाणी तातडीने जलवाहिनी घालण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काम काही ठिकाणी रेंगाळतानाही दिसत आहे. खोदाई केलेली माती आणि दगड रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट बनू लागला आहे.









