तात्पुरती वाट करून दिल्याने मार्ग मोकळा
वार्ताहर/येळ्ळूर
हनुमाननगरमधून अनगोळ शिवारात जाणाऱ्या रस्त्यावर बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक बंद पडली असून शेतकऱ्यांनी ये-जा करण्यासाठी तात्पुरती पायवाट करून मार्ग काढला आहे. उन्हाळ्यात रोजगार हमी योजनेतून बळ्ळारी नाल्याकडे शिवारातून जाणाऱ्या कालव्याची खोली वाढवण्यासाठी खोदाई केली होती. कालव्याच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या अनेक झाडांची मुळे सैल झाली होती. पाऊस आणि वारा यामुळे आता झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असून याआधीही अशी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पण पर्यायी मार्ग असल्याने त्यावेळी फारशी अडचण भासली नाही. ही घटना सकाळी सहाच्या दरम्यान घडल्यामुळे सकाळी शिवाराकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. रस्त्याखालील वाफ्यातील पिकांतून लोकांची ये-जा बघून शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी तात्पुरती एक-दोन फुटाची वाट करून पर्याय काढला आहे. पावसाची उघडीप बघता शेतीकामासाठी शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी झाडाची विल्हेवाट लावून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.









