कराड / सुभाष देशमुखे :
वाहतूक नियंत्रण शाखेचं मुख्य काम म्हणजे वाहतुकीचं नियमन, शिस्त आणि कायद्याचं पालन. पण कराडच्या वाहतूक शाखेने या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन एका वेगळ्याच कार्यपद्धतीची पायाभरणी केली आहे. अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी चोरीच्या १४ दुचाकी हस्तगत करत १६ संशयित चोरट्यांना कायद्याच्या ताब्यात दिलं आहे. वाहतूक नियमन करणे एवढेच आमचे काम… असे म्हणून हात न झटकता दुचाकी चोरट्यांनाही धक्का देत कायम टिकेचे धनी बनणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
कराड शहर व परिसरात गत वहा वर्षांत वाहनांची संख्या तिप्पटीने वाढल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. वाहनांची संख्या वाढली तरी रसते तेवढेच अरुंद अपुरी पार्किंग सुविधा आणि वाहनचालकांची बेफिकिरी या सगळ्यांवर उपाय शोधताना अनागोंदी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं, वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणं हे रोजच आहे. अशा परिस्थितीत वाहतूक शाखेतील काही पोलीस या गुंतागुंतीतच आपले कर्तव्य चोख बजावतात तर काही ‘दिवस भरला… चला घरला असे काम करतात.
- दुचाकी चोर बनताहेत शिरजोर
कराड शहर व परिसरात गर्दीच्या ठिकाणांवरून सरासरी आठवडयाला एक तरी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात येत असतात. ज्या प्रमाणात दुचाकी चोरीस जातात त्या प्रमाणात चोरटे गजाआड होत नाहीत हे वास्तव आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेसह कराड ग्रामीण पोलिसांनी प्रयत्न करून आजपर्यंत अनेक दुचाकी चोरट्यांकडून हस्तगत केल्या असल्या तरी दुचाकी चोर अजूनही शिरजोर असल्याचे चित्र आहे.
- वाहतूक नियमन कराच… गुन्हेगारांवरही नजर ठेवा
कराड शहर वाहतूक शाखेचे तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांनी वाहतूक शाखेतील मनोवृतीला शिस्तीची चौकट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी ही शिस्त टिकवून ठेवत ‘संशयास्पद बाहन तपासणी सारखा उपक्रम सुरू केला. सूर्यवंशी यांनी त्या प्रकारे सूचना दिल्या. या सूचनांची अंमलबजावणी तपासण्यास सुरुवात झाली आणि कायद्याच्या चौकटीत राहून कार्यक्षमतेने संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवले जाऊ लागले. ‘हे आमचं काम नाही…’ असे म्हणत हात झटकण्याऐवजी कराड शहर वाहतूक पोलिसांनी संशयित दुचाकीवर लक्ष केंद्रित केले.
- मोटारसायकल चोरांची गचांडी पकडलीच
वाहतूक पोलिसांनी संशयास्पद वाहन तपासणी करण्यावर भर देत ६ महिन्यांत तब्बल १४ चोरीच्या दुचाकी पकडल्या. ज्या दुचाकी इतर जिल्ल्यातून चोरून आणत त्या कराडात बिनधास्त फिरत होत्या. चोरट्यांच्या या बिनधास्तपणाला वाहतूक पोलिसांनी काही प्रमाणात का होईना ब्रेक लावला.
- चोरीच्या दुचाकी तीन जिल्हयातील
वाहनाच्या नंबरप्लेटवरून सुरू झालेला रापास, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यापर्यंत पोहोचला. या मोहिमेअंतर्गत त्यांनी पलूस, शिराळा, भिलवडी (सांगली), शिरोली, जयसिंगपूर, इचलकरंजी (कोल्हापूर) आणि बारामती (पुणे) या भागांतून चोरीस गेलेल्या दुचाकी पकडल्या. काही चोरटे कराडमध्ये वाहनांसह मोकाट फिरताना गजाआड करण्यात आले, असे संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले.
- दुचाकी चोरांवर आता ‘सामूहिक नजर’
कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने नियमन करतानाच चोरीच्या दुचाकी पकडण्याची मालिका सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणावरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असून यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे सामूहिक प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये वाहतूक शाखेने आघाडी घेतली असून कराड वाहतूक शाखेच्या अधिकारी, पोलिसांनी यापुढेही असेच सतर्क रहावे, अशी प्रतिक्रिया पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिली








