कोल्हापूर :
अंबाबाई मंदिर परिसरात अतिक्रमनाचा विळखा आहे. भवानी मंडपमध्ये दुचाकी लावणे बंधनकारक आहे. तरीही राजवाडा पोलीस ठाण्यासमोर काही दुचाकी गाड्या लावलेल्या असतात. दररोज अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होतो. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे. देश-विदेशातून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक हजेरी लावतात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन मंदिर समितीच्या वतीने दसऱ्यामध्ये दर्शन मंडपसह अन्य सुविधा भाविकांना पुरवल्या जातात. वर्षभर मात्र दर्शन रांग असते परंतू भाविकांना सुविधा मिळत नाहीत. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीचे नियम दाखवले जातात. मात्र मंदिर परिसरातील काही विक्रेते दर्शन रांगेपर्यंत दुचाकी घेवून जातात. याकडे पोलीस जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात. तसेच राजवाडा पोलीस ठाण्यासमोर दुचाकींची मोठी गर्दी पाहायला मिळते. या वाहनांना नियम आहेत की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. तसेच मंदिराच्या दक्षिण दरवाजातून आत गेल्यानंतर भाविकांच्या गर्दीतही निवांतपणे झापलेले कुत्रे सुरक्षा रक्षकांना दिसत नाही का? असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
अंबाबाई मंदिर अतिक्रमनाचा विळख्यात आहे, असा आरोप कायमच केला जातो. अंबाबाई मंदिर विकास आराखडा होईल तेंव्हा होईल. परंतू जोतिबा रोडवरून जाणाऱ्या वाहनांना शिस्त नसल्याचे चित्र आहे. या बेशिस्त वाहनधारकांचा भाविकांना त्रास होतो. तसेच अनेकदा वाहनांचा धक्का लागून भाविक खाली पडल्याचेही बोलले जाते. तरीदेखील येथे वाहनांची प्रचंड गर्दी असते. रांगेत चाललेल्या भाविकांच्या रांग तोडून काही वाहनधारक जातात. परंतू वाहतुक नियंत्रक कक्षाचे पोलिस या वाहनांना शिस्त लावताना दिसत नाहीत. अंबाबाई दर्शन रांगेत जाताना पत्र्यावरून पडणाऱ्या पाण्याने भाविकांची आंघोळच होते. परंतू देवस्थान समितीकडून पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन केले जात नाही, असा आरोप भाविकांकडून केला जात आहे.
- वाहने गेल्यानंतर पावसाचे पाणी अंगावर उडते
संसाराचा गाडा हकण्यासाठी ओटी, रांगोळी, फुल विक्रेते जोतिबा रोडवर बसतात. पाऊस सुरू झाला की वाहन आल्यानंतर आमच्या अंगावर पाणी उडते. तरीही वाहनधारक पर्वा न करता गाडी घेवून पुढे जातात. आम्ही कोणाकडे तक्रार करायची ? असा आमच्यासमोर प्रश्न आहे.
-सुजाता पाटील (विक्रेते)
- पोलीस ठाण्यापर्यंत वाहन जातात कशी
सर्वसामान्य नागरिक किंवा भाविक दुचाकी घेऊन येतात. तेंव्हा भवानी मंडपच्यापुढे वाहन घेवून जाऊ दिले जात नाही. परंतू काही दुचाकीस्वार पोलीस स्टेशनच्यासमोर दुचाकी कायम लावतात. तसेच येथील विक्रेतेही आपल्या स्टॉलपर्यंत गाड्या घेवून येताता. ही वाहन पोलीस ठाण्यापर्यंत जातात कशी? असा आम्हाला प्रश्न पडतो.
-उमेश शिंदे (भाविक)
- पुर्व दरवाज्याच्या दर्शनी भागातच कचरा पेट्या
जोतिबा रोडवरून अंबाबाई मंदिरच्या पुर्व दरवाजातून आत जातानाच दर्शनी भागात कचरा पेट्या ठेवलेल्या आहेत. भाविक मंदिरात प्रवेश करण्यासाठी जातानाच अगोदर कचरा पेट्यांचे दर्शन होते. त्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
- पिण्याच्या पाण्याजवळील अस्वच्छता
अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. येथे साधे व थंड पाणी ठेवण्यात आले आहे. परंतू या पाण्याजवळील अस्वच्छता पाहून कोणत्याही भाविकाला पाणी पिण्याची इच्छा होणार नाही. याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती लक्ष देणार की नाही?








