विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे वाहतूक वळविली : वाहतूक कोंडीमुळे शहरात चक्काजाम झाल्याचे निदर्शनास

बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र सोमवारपासून अर्ज भरण्यास वेग आला असून शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणा प्रक्रिया सुरू आहे. मात्र गर्दी होण्याची शक्यता असल्याने निवडणूक कार्यालय परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून विविध मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे चक्काजाम झाला होता. विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार निश्चित झाल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेग आला आहे. सोमवारी विविध कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी विविध मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. विशेषत: निवडणूक कार्यालय परिसरातील रस्ते बॅरिकेड्स लावून बंद ठेवण्यात आले होते. रिसालदार गल्लीच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद होता. नार्वेकर गल्ली तसेच रिसालदार गल्लीने जाणाऱ्या वाहनधारकांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागला. त्याचप्रमाणे राणी चन्नमा चौकापासून महापालिका कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शन करीत काही उमेदवार अर्ज भरण्यासाठी जात होते. त्यामुळे राणी चन्नम्मा चौक ते आरटीओ चौकपर्यंतच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. काही मोजके रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
विविध मार्गांवर वाहतूक कोंडीचा फटका
सध्या विवाहासाठी तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. शहराची बाजारपेठ महत्त्वाची असल्याने महाराष्ट्र, गोवा या राज्यांसह बेळगाव जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशातच वाहतूक वळविण्यात आल्याने विविध मार्गांवर वाहतूक कोंडीचा फटका बसला. बॉक्साईट रोड, बेळगाव-वेंगुर्ला रोड तसेच शहरांतर्गत असलेल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीमुळे चक्काजाम झाल्याचे निदर्शनास आले. विशेषत: बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागले. रमजान ईदमुळे खडेबाजार रोडवर गर्दी होत आहे. त्यामुळे गणपत गल्ली कॉर्नरजवळ बॅरिकेड्स लावून खडेबाजारमधील वाहतूक वळविण्यात आली आहे. परिणामी वाहनधारक गणपत गल्लीमार्गे किंवा काकतीवेस रोडने ये-जा करीत आहेत. तर रिसालदार गल्लीचा रस्ता शनिवार खूटजवळ बंद असल्याने खंजर गल्लीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अशाप्रकारे शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या सोमवारी दिसून आली.
वाहतूक सुरळीत करण्याची मागणी
रखरखत्या उन्हात वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले. तर सायंकाळीदेखील बाजारपेठेत गर्दी होत असल्याने तासन्तास वाहतूक कोंडी होत आहे. काही मोजक्याच ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुतांश रहदारी पोलीस विनाहेल्मेट व कागदपत्र तपासणीच्या कामात गुंतल्याचे दिसत आहेत. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विनाहेल्मेट कारवाई करण्याऐवजी सध्या शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याच्यादृष्टीने रहदारी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.









