पर्यायी मार्गाच्या रुंदीकरणाची नागरिकांची मागणी
बेळगाव : पहिले रेल्वे गेटवर घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे सर्व प्रकारची वाहने दुसरे रेल्वेगेट फाटकावरून ये-जा करत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्यासह व्यापारी आणि रहिवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुसरे रेल्वेगेट मारुती मंदिर (गुरु स्नॅक्स) ते शिवलिंग मंदिर महर्षि रोड या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. जिकडे तिकडे वाहतूक कोंडी होण्यासह नागरिकांना धुळीचा सामना करण्याची वेळ आली आहे. एलअँडटी कंपनीकडून 24 तास पाण्यासाठी पाईपलाईन घातली जात आहे. मात्र खोदण्यात आलेल्या चरीमध्ये मातीच टाकण्यात आली आहे. त्यावर काँक्रिट किंवा डांबरीकरण करण्यात आले नसल्याने त्यावरूनच वाहने ये-जा करत आहेत. परिणामी धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा नाहक त्रास वाहनचालक आणि व्यापारी तसेच रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
धुळीचे लोळ घरे तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये शिरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावाखाली ठिकठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तानाजी गल्लीतील रेल्वे फाटक कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. पहिले रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटविण्यात यावेत यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केली जात आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा अधिक भार दुसरे रेल्वे फाटकावर पडत आहे. या मार्गावरून लहान तसेच अवजड वाहने सातत्याने ये-जा करत आहेत. याचा फटका व्यापारी व रहिवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडी व धुळीची डोकेदुखीही वाढली आहे. दुसरे रेल्वेगेट मारुती मंदिर (गुरुस्नॅक्स) ते शिवलिंग मंदिर महर्षि रोड दरम्यानचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.









