तासगाव / सुनिल गायकवाड :
तासगांव शहरात वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी तासगांवात वाहतुक शाखेचे पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यामुळे शहरात सततची वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीस अपेक्षित शिस्त लागत नसल्याचे दिसून येत आहे. तासगांवात शेकडो वाहनांचा भार एक अधिकारी व पाच पोलीस अशा केवळ सहा पोलीसांवर असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांनी अपेक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती वाहतुक शाखेत करावी अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
वाहनांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. शहरातील अरूंद रस्ते, बाह्य वळण रस्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न, अतिक्रमणे, रस्त्यावर मनमानीपणे लावण्यात येणारी वाहने, वाढलेली वाहन संख्या या प्रमुख कारणांमुळे शहरातील विटा नाका ते सांगली नाका, एस टी बस स्टॅन्ड चौक ते सिध्देश्वर चौक या दोन प्रमुख मार्गावर अधिकची वाहतुक कोंडी होताना पहावयास मिळत आहे.
शहरात सोमवार, गुरूवार व शनिवार हे तीन आठवडा बाजार भरतात. सोमवार व गुरूवार बाजार दिवशी तर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांच्यातून नको ते तासगांव असाच सूर वाहतुक कोंडीमुळे निघत आहे.
शहरात अरूंद रस्ते असले तरी प्रमुख मार्गावर इतर वाहने थांबली नाहीत, अतिक्रमणे हटवली तर वाहतुक कोंडी होत नाही असेही दिसून येत आहे. शहरातील स्टॅन्ड चौक ते सिध्देश्वर चौक व विटा नाका ते सांगली नाका या मार्गावर अधिकची वाहतुक कोंडी होत आहे. या मार्गावर बँका, दुकाने व कामानिमित्त काही वाहनचालक रस्त्यावरच आपले वाहन लावतात. तसेच काही दुकानात बाहेरून आलेला माल उत्तरवण्यासाठी त्या दुकानसमोर टेम्पो सारखी वाहने थांबून रहात आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे.
शहरातील विटा नाका येथे पुणदी रोडकडे जाणाऱ्या चौकात वाहनांची अधिकची गर्दी होत आहे. मात्र या चौकात नियमित वाहतुक पोलीस नसल्याने वाहनचालक मनमानीपणे वाहने चालवताना दिसून येतात. त्यामुळेही वाहतुक कोंडी होत आहे. तसेच गणपती मंदिर चौक येथे चार चाकी वाहने रस्त्यावर लावून काही मंडळी ज्युस पिताना दिसून येतात. काही मंडळी दर्शनासाठी रस्त्यावरच गाडी लावून जातात. त्यामुळेही वाहतुक कोंडी होताना दिसून येत आहे. तसेच गणपती मंदिर ते पोस्ट ऑफिस या मार्गावर रस्त्याच्या कडेला दिवसभर पार्किंग असल्याप्रमाणे काही वाहने लावली जातात. तसेच गुरूवार पेठ येथील मारूती मंदिर चौकातून वन वे असताना गणपती मंदिरकडे काही चार चाकी वाहने मार्गस्थ होतात. यामुळेही वाहतुक कोंडी होत आहे.
- एक अधिकारी व पाच पोलीसांवर भार..
शहरात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी तासगांव पोलीस ठाणेतील वाहतुक शाखा शर्थीचे प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे. मात्र या शाखेसाठी एक स.पो.नि.तसेच १० वाहतुक पोलीस असा स्टाफ मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात एक स.पो.नि.तसेच सहा वाहतुक पोलीस असे अपुरे पोलीस कर्मचारी आहेत. यापैकीच एकांची साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे प्रत्यक्ष ड्युटीवर केवळ सहा लोकच पहावयास मिळतात. तसेच यापैकीच काहींना बाहेरच्या बंदोबस्तासाठीही जावे लागते. त्यामुळे ड्युटीवर आहेत त्यांना वाहतुकीस शिस्त लावणे अडचणीचे ठरत आहे.
हे पोलीस फक्त ठराविक ठिकाणीच थांबून सेवा बजावताना दिसून येतात. अपेक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास वाहतुक कोंडी दुर होण्यास मदत होऊ शकते असे दिसून येत आहे. तर एक अधिकारी व पाच पोलीस यांच्यावर शेकडो वाहनांचा भार असेच चित्र पहावयास मिळत आहे
- वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी हे आवश्यक
▶ कोणताही राजकीय हस्तक्षेप न जुमानता वाहतुक पोलीसांनी निपक्षपातीपणे क्रेनने उचलेल्या वाहनांसह इतर वाहनावर कारवाई करणे आवश्यक आहे.
▶ शहरातील वाहतुक पोलीस शाखेत अपेक्षित पोलीस कर्मचारी नियुक्त होणे आवश्यक आहे.
▶ वाहतुक पोलीसापैकी रोज एका पोलीसांनी दुचाकी वरून प्रमुख मार्गावर पेट्रोलिंग करून कोणते वाहन रस्त्यात उभे आहे यावर लक्ष ठेवणे, प्रसंगी कारवाई करणे आवश्यक आहे.
▶ गणपती मंदिर चौकातील ज्यूस सेंटर समोरील अतिक्रमणे हटवून रस्त्यावर वाहन लावून कोणीही ज्युस घेणार नाही यासाठी या चौकात कायम स्वरूपी वाहतुक पोलीसांची नियुक्ती असावी, तसेच गुरूवार पेठ मारूती मंदिर चौक व विटा नाका चौक (पुणदी रोड) येथेही कायमस्वरूपी वाहतुक पोलीसांची नियुक्ती असावी.
▶ दुकानात माल उतरण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांना व दुकान मालकांना सकाळी लवकर ९ पूर्वी अथवा दिवसभराची गर्दी कमी झाल्यानंतर रात्री ८ नंतर आपले वाहन आणावे अशी सुचना करावी.








