सावंतवाडी / प्रतिनिधी
तळवडे बाजारपेठेत नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तळवडे बस स्टॉप जवळ वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. या ठिकाणी रस्त्या लगतच बांधकाम करण्यात आल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा होत आहे. शनिवारी आज सकाळी या मार्गावर जवळपास एक ते दीड तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. उष्माच्या लाटेत वाहतूक कोंडी झाल्याने बसमधील प्रवासी हैराण झाले होते . बस चक्क दीड तासहुन अधिक काळ रस्त्यावरच उन्हात उभी असल्याने त्यातील ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना त्रास झाला. प्रवाशांनी या वाहतूक कोंडीबाबत संताप व्यक्त केला. सदर मार्गालगत बांधकाम करण्यात आल्याने सदरच्या बांधकामाबाबत नागरिकांनी एसटी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला याबाबत कळवले आहे. तरी पण याकडे कानाडोळा करण्यात येत आहे . सदरचे रस्त्यालगतचे बांधकाम तात्काळ तोडण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.









