रहदारी पोलीस लक्ष देणार का? वाहतूक वळविताना पूर्वसूचना देणे गरजेचे
बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे केली जात आहेत. मात्र त्या कामांचे नियोजन नाही. वाहतूक वळविण्याबाबत मार्गसूची नाही. त्यामुळे मोठा त्रास बेळगावकरांना सहन करावा लागत आहे. गोवावेसजवळ आता काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला. परिणामी शहापूर परिसरात ये-जा करणे अवघड झाले आहे. तेव्हा प्रथम वाहतुकीला वळविण्याबाबत मार्गसूची जाहीर करावी, त्यानंतरच रस्ते अडवावेत, अशी मागणी होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून रेल्वेओव्हरब्रिज ते तिसरे रेल्वेगेट आणि तिसऱ्या रेल्वेगेटजवळील ओव्हरब्रिजचे काम सुरू होते. मात्र यामधील अनेक कामे अर्धवटच आहेत. गोवावेसजवळ यापूर्वी काँक्रीटचा रस्ता करण्यात आला. त्यानंतर त्याची खोदाई करण्यात आली. आता पुन्हा रस्ता करण्यात येत असून मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या गोवावेसजवळ काम सुरू केल्यामुळे आरपीडी क्रॉस, टिळकवाडीकडून येणाऱ्या लोकांना दुसऱ्या रेल्वेगेटमार्गे काँग्रेस रोडला जावून त्यानंतर वळसा घालून गोगटे सर्कलमार्गे शहापूरला यावे लागत आहे. त्यामुळे वेळ अधिक लागत असून वाहतूक कोंडीही होत आहे. वास्तविक हे काम सुरू करताना प्रथम वाहनांना ये-जा करण्याची व्यवस्था केली पाहिजे. गोवावेस ते आरपीडी हा दुपदरी रस्ता आहे. त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू ठेवणे गरजेचे होते. मात्र दोन्ही बाजूंनी रस्ता अडविणे चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटविण्याची मागणी
स्मार्ट सिटीची कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. सदर काम सुरू झाल्यामुळे अनेकजण पहिल्या रेल्वेगेटमार्गे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याठिकाणीही बॅरिकेड्स लावल्यामुळे दुसऱ्या रेल्वेगेटजवळ असलेल्या जागेतून वळसा घालून यावे लागत आहे. बस व मोठी वाहने परतणे अवघड आहे. तेव्हा किमान पहिल्या रेल्वेगेटजवळील ते बॅरिकेड्स काही दिवसांसाठी तरी हटवावेत. त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही, अशी मागणी होत आहे.









