पणजी : राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे परत सुरू करण्यात आली असून हॉटमिक्स डांबरीकरण झालेले रस्ते पुन्हा खोदण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी, धूळ प्रदूषणाने लोक त्रस्त झाले असल्याचे दिसून येत आहे. पणजीचे रहिवासी आणि राजधानीत येणाऱ्या वाहनचालकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. पणजीकरांना तसेच पणजीत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना, पर्यटकांना धुळीचा, प्रदूषणाचा सामना करावा लागत असून वरील कामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यातून सुटका करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून पोलिसच नसल्याचे समोर आले आहे.
स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याची वाढीव मुदत 31 मार्च 2025 पर्यंत देण्यात आली असून त्यासाठी आता केवळ तीन महिनेच बाकी आहेत. तत्पूर्वी कंत्राटदारांना सर्व कामे पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पदपथ (फुटपाथ) दुरुस्तीची कामे चालू असून त्यासाठी अनेक प्रकारची विविध यंत्रे रस्त्यावर आणली जात असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. डॉन बॉस्को शाळेजवळ तसेच 18 जून रस्त्यावर काकुलो आयलँड, पब्लिक कॅफेजवळ, महिला बालविकास खात्यासमोर अशा विविध ठिकाणी रस्ते खणून ठेवल्याने पणजी पुन्हा धुळग्रस्त होताना दिसत आहे. दुकाने, आस्थापने यांनाही त्याचा फटका बसतो आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास चालू असल्याने लोक स्मार्ट सिटीला आता कंटाळले आहेत.









