नरगुंदकर भावे चौक येथील प्रकार : पोलिसांनीच मार्ग काढण्याची वाहनचालकांतून मागणी
बेळगाव : नरगुंदकर भावे चौक येथे विक्रेत्यांनी रस्त्यामध्येच दुकाने थाटल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही अवघड झाले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गणेश उत्सव मंडळांनी मंडपाचा आकार कमी केला. परंतु आसपासच्या विक्रेत्यांमुळे पुन्हा आहे तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनीच यातून मार्ग काढावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. मारुती गल्ली, गणपत गल्ली, कलमठ रोड, रविवार पेठ या परिसरात गणेश उत्सवामुळे प्रचंड गर्दी होत आहे. नरगुंदकर भावे चौकात गणेश उत्सवासाठी मंडप घालण्यात आला त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ये-जा करण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. परंतु काही विक्रेते या सोडलेल्या जागेमध्येही दुकाने लावत आहेत. त्यामुळे अडचणींमध्ये अधिकच भर पडत आहे. रविवारी बाजारात प्रचंड गर्दी असताना विक्रेत्यांमुळे अधिकच कोंडी होऊ लागली. मंडळांनी मंडपाचा आकार कमी केला. परंतु विक्रेत्यांनी त्या जागेतही सजावटीचे साहित्य मांडून विक्री करण्यास सुरुवात केल्याने दुचाकी येणेही अशक्य झाले आहे. आता गर्दीत दिवसेंदिवस वाढ होणार असून, पुढील धोका लक्षात घेऊन रहदारी पोलिसांनी या ठिकाणच्या विक्रेत्यांना हटवावे व रहदारीसाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.









