जेएमएफसी न्यायालय आवारात पार्किंगचे नियोजन करण्याची गरज, अन्यथा भविष्यात गंभीर समस्या : ठोस निर्णयाची गरज
बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. दोन्ही बाजूला पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. गुरुवारी दुपारी जवळपास तीन ते चारवेळा वाहतुकीची कोंडी झाली. वकिलांनीच थांबून ती कोंडी सोडविली. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव बार असोसिएशन आणि रहदारी पोलिसांनी पार्किंगबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात खुल्या जागेमध्ये नूतन इमारतींची उभारणी करण्यात आली. ही इमारत उभी करताना पार्किंगबाबत गांभीर्याने घेण्यात आले नाही. त्यामुळे आता त्याचा फटका बसू लागला आहे. या ठिकाणी सध्या असलेल्या जागेमध्ये काही रिअल इस्टेट व्यावसायिक पार्किंग करून ते आपल्या कामामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे इतर वकिलांना आणि त्यांच्या पक्षकारांना पार्किंग करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही.
चारचाकी वाहनांमुळे अडचण
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे वकील किंवा पक्षकार हे चारचाकी वाहने घेऊन न्यायालयाकडे येत आहेत. त्यामुळे पार्किंगला जागा मिळणे अवघड झाले आहे. दुचाकी वाहनांची संख्याही अधिक आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात असलेल्या इमारतींमध्ये न्यायालयांची संख्यादेखील पूर्वीपेक्षा वाढली आहे. त्यामुळे याच आवारातच सर्वजण पार्किंग करताना दिसत आहेत. मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातही बऱ्याचवेळा पार्किंगची समस्या होत असते. त्या ठिकाणी असलेले सेक्युरिटी गार्ड वाहनचालकांना योग्यप्रकारे पार्किंग करण्यास मार्गदर्शन करत आहेत. मात्र, जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात बेशिस्तपणे पार्किंग होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग होत असल्यामुळे वाहनांना ये-जा करणे अवघड जात आहे. यातच न्यायालयाच्या समोरच सतत रहदारी असलेला कित्तूर चन्नम्मा ते सीबीटीला जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरही सतत रहदारी आहे. न्यायालयाकडून येणाऱ्या वाहनांना रस्ता पार करणे अवघड जात आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूक असल्यामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडी होत आहे.
पार्किंगसाठी आराखडा तयार करावा
सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळे दुचाकीस्वारांना त्याचा मोठा फटका बसत आहे. वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे पावसात भिजतच ताटकळत थांबावे लागत आहे. वाहनांची संख्या वाढत आहे, तेव्हा आता बार असोसिएशन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने पार्किंगच्या सोयीबाबत मोठा निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करून पार्किंगसाठी नियोजन करावे, अशी मागणी वकीलवर्गातून होत आहे.









