सांगली / संजय गायकवाड :
सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांना जोडणाऱ्या सांगली कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी चौकातील वाहतुकीची कोंडी फुटता फुटेना असे झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा चौक रूंदीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अरूंद चौक यामुळे येथे बाराही महिने वाहतुकीची कोंडी आणि छोटेमोठे अपघात होतात.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन यांनी संयुक्तरित्या मोहिम राबवून आकाशवाणी चौकाचे रूंदीकरण अगर येथे वाहतुक सुरळीत करण्यासाठी पावले उचलावीत, अशी वाहनचालक आणि नागरिकांतून मागणी करण्यात येत आहे.
सांगली कोल्हापूर रोडवर मागील वीस वर्षात वाहतुकीची प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. जयसिंगपूरच्या अलीकडे बायपास रोड काढून या मार्गावरील वाहतुकीला पर्यायी मार्ग सुरु करण्यात आला. हरिपूर रोडवर कृष्णा, वारणा नदी संगमानजीक नवीन पुल उभारला आहे. कोल्हापूराकडून मिरजेकडे जाणारी अवजड आणि बेट जाणाऱ्या काही एसटी बसेस या अंकलीतून नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाने पुढे जात असल्या तरी सांगली कोल्हापूर रोडवरील वाहनांची संख्या मात्र कायम आहे.
अंकलीपासून सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. सांगलीला इतर शहरांनी जोडलेले जे जे मार्ग आहेत. त्यातील सांगली कोल्हापूर, सांगली मिरज आणि सांगली माधवनगर हे तीन मार्ग प्रचंड वर्दळीचे मार्ग म्हणून ओळखले जातात.
सांगली मध्यवर्ती बसस्थानकापासून अंकलीपर्यंत अनेक जोडरस्ते येऊन मिळतात. त्यातीलच एक म्हणजे आकाशवाणी चौक, मुळात हा चौक खूपच अरूंद आणि लहान असल्याने येथे वाहनांना वळताना अडचणीचे होते. आकाशवाणी चौकात चार रोड एकत्र आलेले आहेत. यातील एक रोड हा हरिपूरच्या दिशेने आलेला आहे. तुलनेने या रोडने ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे. याच चौकाला खिलारे मंगल कार्यालयाच्या दिशेने येणारा दुसरा एक रस्ता जोडलेला आहे. या रोडवर बऱ्यापैकी वाहतुक असते.
सर्वात जास्त वाहतूक आहे ती सांगली व कोल्हापूर या दोन्ही बाजूनी ये जा करणाऱ्या वाहनांची हा राज्यमहामार्ग असल्याने दोन्ही जिल्हयातील विविध डेपोंच्या एसटी बसेस, खासगी आरामगाड्या, मालमोटारी, रिक्षा स्कूल बसेस, ऊस हंगामावेळी बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रॅक यासह नृसिंहवाडीकडे जाणारे भाविक, शिरोळ, जयसिंगपूर, कुरूंदवाड आणि इचलकरजी या शहरांकडे जाणाऱ्या एसटी बसेस यांनी मोठी वर्दळ आहे. त्यामुळे या चौकात वाहतुकीनी कोंडी होत असते.
विशेषतः कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांना जर खिलारे मंगल कार्यालयाकडील रोइकडे जायचे असेल तर वेळ लागतो. त्यामुळे या चौकात वाहनचालकांची वादावादी ही रोजचीच झाली आहे. शहरातील अन्य चौकाप्रमाणेच या चौकालाही हातगाडयांचा गराडा पडलेला आहे. येथे फेरीवालेही असतात. त्यामुळे या चौकाची रयान गेली आहे. त्याप्रमाणे खिलारे मंगल कार्यालयाकडून सांगलीकडे जाणाऱ्या दुचाकीसह अन्य गाड्यांनाही चौकातून वाट काढताना नाकी नऊ येते. या चौकातील अपघातांचे प्रमाण कायम आहे. या चौकाला मनपाने शिस्त लावण्याची आवश्यकता आहे.
आयुक्त सत्यम गांधी यांनी चौकांची प्रत्यक्ष पाहणी करून चौक रूंदीकरणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. त्यानप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागानेही सांगली कोल्हापूर रोडच्या सुधारणेसाठी व या रोडवरील वाढत्या अतिक्रमणाला चाप लावावा, अशी मागणी शहरवासायितून होत आहे.








