सांगली / संजय गायकवाड :
कृष्णा नदीवरील बायपास रोड, सांगली कर्नाळ रोड आणि कॉलेज कॉर्नर, माधवनगर सांगलीवाडी या रोडवरील महत्वाचा परंतु वाहनचालकांच्या बेशिस्तीपणामुळे रया गेलेल्या शिवशंभो चौकात कुणाचा कोणाला पायपोस नाही. शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकीपर्यंतच्या असंख्य छोटया मोठ्या खड्यामुळे या मार्गावर दुचाकींचे सातत्याने अपघात होत आहेत. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
सांगलीत अनेक छोटेमोठे चौक आहेत. शिवशंभो चौक हा त्यातीलच प्रमुख चौक आहे. सांगली शहर आणि सांगलीवाडी या दोन भागांना जोडणारा आणि सांगली इस्लामपूर मार्गावरील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक तीन चार वर्षापासून बंद करण्यात आली आहे. आयर्विनवरून रिक्षासह छोटी वाहने आणि दुचाकी गाडया ये जा करतात. पण एसटी बसेस, ट्रॅक, कंटेनर, ऊस वाहतूक करणाऱ्या गाडया, ट्रॅक्टर, खासगी आरामगाडया आदी वाहने बायपास रोडवरील नव्या पुलावरून येजा करू लागली आहेत. या सर्व वाहनांना शिवशंभो चौक पार करावा लागतो. यात सांगलीहून मुंबई, पुणे, सातारा, कराड, इस्लामपूर, आष्टयासह कवठेपिरान, दुधगाव, समडोळी कसबेडिग्रज आदी भागाकडे ये जा करणाऱ्या सर्व एसटी गाडया आणि सिटी बसेसचा समावेश आहे.
त्याशिवाय सांगलीहून पलूस, कुंडल, ताकारी, येळावी, बांबवडे, पाचवा मैल, भिलवडी, सुखवाडी, चोपडेवाडी, अंकलखोप औंदुबर यासह घाटावरील कडेगाव, कडेपूर, वांगी, सोनसळ, मोहित्यांचे वडगाव आदी भागाकडे ये जा करणाऱ्या एसटी बसेस आणि अन्य सर्व वाहनांना शिवशंभो चौकातूनच पुढे जावे लागते. त्यामुळे या चौकात वाहनांची दिवसभर मोठी गर्दी असते.
सांगली स्टॅन्डकडे येणाऱ्या सर्व एसटी बसेस या पुर्वी कर्नाळ पोलीस चौकी, जामवाडी येथून पटेल चौकातून राजवाडा चौकातून शहरात प्रवेश करत असत. आता यातील काही बसेस या कॉलेज कॉर्नर तर काही गाडया या कर्नाळ पोलीस चौकीमार्गे ये जा करत असतात. दोन्ही मार्गाने गेले तरी या सर्व वाहनांना शिवशंभो चौकातूनच जावे लागते.
सांगली शहराला ज्या ज्या वेळी महापुराचा फटका बसला त्या त्या वेळी हा चौक पाण्याखाली गेलेला आहे. सांगलीमध्ये ज्या भागातून पाणी शिरण्यास सुरुवात होते. त्या दत्तनगर, काकानगर, कर्नाळ रोड, सुर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉट या सर्व भागांशी हा चौक जोडलेला आहे. रात्री. अपरात्री जर एखादा प्रवासी या चौकात उतरला आणि तो शहरात अगर आसपास कुठे चालत निघाला तर त्याच्या पाठीमागे कुत्र्यांची झुंडच लागते. मनपाची डॉग व्हॅन येथे कधी येथे हा संशोधनाचा विषय झाला आहे. मुळात हा चौक खूप मोठा आणि रूंद असतानाही या चौकाला शिस्त नावाचा प्रकार माहित नाही. कोणीही कशाही गाडया पळवितात. समोरून येणारे वाहन न पाहता प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या चौकात यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघात झालेले आहेत. येथे वाहतूक पोलीस कार्यरत असतात. पण चौकच एवढा मोठा आहे की ते तरी कुठे कुठे लक्ष देणार.
सांगलीमध्ये बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे. गाडया कशाही चालविल्यामुळे अपघात होवू शकतो. समोरच्या माणसाला इजा होवू शकते. याचा अजिबात विचार न करता गाडया चालविल्या जातात. वाहतूक पोलीसांकडून सुचना करूनही या चौकात अपघात होईल अशा ठिकाणी वाहने उभे करणारे महाभाग आहेत. चौकात ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची आवश्यकता आहे. पण त्याअगोदर शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी हा रस्ता चांगला करण्याची आवश्यकता आहे. सांगली शहरात मनपाकडुन नको आणि चांगल्या रस्त्यांवर डांबर फासण्याचा उद्योग सुरू आहे. त्यापेक्षा या रस्त्याकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल अशी भावना सांगलीकर व्यक्त करत आहेत. या चौकात पुरेशा स्ट्रीट लाईटचीही सोय हवी आहे. एकूणच महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागा यांनी संयुक्तपणे ट्रॅफिक सिग्नलची सोय करावी अशी मागणी होत आहे.








