मराठी विद्यानिकेतनच्या पटांगणावर जय्यत तयारी : कॅम्प येथे देवींची मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने विजयादशमी दिवशी सीमोल्लंघन सोहळा साजरा केला जातो. शहर देवस्थान मंडळ, तसेच बेळगावमधील प्रमुख मंदिरांच्या पालखी सोहळ्यांनी सीमोल्लंघन केले जाते. यासाठी कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या पटांगणावर जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांना पालख्यांचे दर्शन घेता येईल, यासाठी मंडपांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. बेळगावमध्ये वैशिष्ट्यापूर्ण पद्धतीने सीमोल्लंघन सोहळा होतो. चव्हाट गल्ली येथील पंच कमिटीच्यावतीने जोतिबाची सासनकाठी व नंदी यांची विधिवत पूजा करून मिरवणुकीला सुरुवात होते. त्यानंतर शहरातून इतर देवदेवतांच्या पालख्या व सासनकाठ्या हुतात्मा चौक येथे एकत्रित येतात. चव्हाट गल्ली येथील सासनकाठी, पालखी व नंदी अग्रभागी ठेवून मिरवणुकीने सर्व पालख्या सीमोल्लंघन मैदानाकडे मार्गस्थ होतात. त्यानंतर मानकरी चव्हाण-पाटील घराण्याकडून सोने लुटून सीमोल्लंघन सोहळ्याला सुरुवात होते.
कॅम्प येथे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक
कॅम्प येथे पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा केला जातो. जागृत असलेल्या पाच देवींची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. विविध आकारातील राक्षस, रामायणातील पात्रे रंगवून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला जातो. फिश मार्केट येथील महामाता कुंतीदेवी, बी मद्रास स्ट्रीट येथील दुर्गामुत्तू मरिअम्मा देवी, खानापूर रोड येथील मरिअम्मा देवी, आर. ए. लाईन येथील कुलकत्तम्मा देवी, तेलगू कॉलनी येथील मरिमाता व दुर्गामाता देवींच्या मिरवणुका निघणार आहेत. खानापूर रोड येथून मिरवणुकीला सुरुवात होणार असून फिश मार्केट, हाय स्ट्रीट, पोलीस क्वॉर्टर्स रोड, धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय, सेंट झेवियर्स, कॅटल रोडमार्गे कॅम्प येथे गल्लोगल्ली देवीची पूजा केली जाते.
पोलीस आयुक्तांनी केली पाहणी
सीमोल्लंघन सोहळ्यावेळी बेळगाव शहरासह परिसरातील हजारो भाविक उपस्थित असतात. यादरम्यान कुठेही गोंधळ होऊ नये, सर्व भाविकांना पालखी, तसेच सीमोल्लंघन सोहळा पाहता यावा, यासाठी व्यवस्था केली जात आहे. याची पाहणी बुधवारी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली. त्यांना नवरात्र उत्सव महामंडळाच्यावतीने सोहळ्याची माहिती देण्यात आली. यावेळी मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष आनंद आपटेकर, मल्लेश चौगुले, अंकुश केसरकर, बळवंत शिंदोळकर, लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, मुरगेश अंगडी, उमेश करंबळकर, मनोज काकतकर यांसह इतर उपस्थित होते.









