पुणे / प्रतिनिधी :
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे पारंपरिक वैद्यक जागतिक परिषद (ट्रडिशनल मेडिसिन ग्लोबल समिट) 17 आणि 18 ऑगस्टला गुजरातमधील गांधीनगर येथे होणार आहे. या परिषदेला पारंपरिक वैद्यकीय पद्धती, सार्वजनिक आरोग्य आणि धोरणे या संदर्भात दिशा देण्यासाठी डब्ल्यूएचओने अकरा बाह्य तज्ञांची सल्लागार समिती नियुक्त केली असून, केंद्रीय आयुष मंत्रालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन तज्ज्ञ समितीचे सहअध्यक्ष आहेत.
गांधीनगर येथे होणारी परिषद सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याणाच्या दिशेने या संकल्पनेवर आधारित आहे. या परिषदेत सर्वोत्कृष्ट पद्धती आणि क्रांतीकारक पुरावे, विदा आणि नवसंकल्पना, राजकीय कटिबद्धतेचे लक्ष्य, निसर्ग आणि विज्ञानाबरोबरच पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्ये पुरावेनिष्ठ कृती या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. परिषदेच्या अनुषंगाने तज्ज्ञांच्या बाह्य समितीने काही उदयोन्मुख संकल्पना निश्चित केल्या आहेत. संशोधन आणि पुरावे, जागतिक विदा, प्रादेशिक कल आणि सर्वोत्कृष्ट पद्धती, डिजिटल आरोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवविविधता आणि शाश्वतता, हक्क आणि स्रोत, बौद्धिक संपदा, अडचणी आणि संधी, कायदा आणि धोरण आराखडा अशा विषयांचा त्यात समावेश आहे.
पुरावे आणि विदा, संशोधन पद्धती, जागतिक प्रासंगिकता, संभाव्य प्रभाव आणि इतर बाबींवर आधारित, तांत्रिक पुनरावलोकन निकष आणि परिषदेच्या संकल्पनेशी सुसंगतता यावर सल्ला देणे, परिषदेत संबोधित केलेल्या मुद्यांवर वैज्ञानिक प्रकाशनांच्या विकासावर सल्ला देणे, शिखर परिषदेनंतर प्रमुख धडे आणि प्राधान्य कृतींवर डब्ल्यूएचओसाठी अहवाल विकसित करणे, अशी समितीची कार्यकक्षा आहे.








