अखिल गोवा आंतर महाविद्यालयीन घुमट आरती स्पर्धा : तरुण भारत, धेंपो महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम,लोकमान्य मल्टिपर्पझ को-ऑप. सोसायटीचे पाठबळ
पणजी : गोव्याच्या पारंपरिक घुमट आरती परंपरेला महाविद्यालयीन स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी दैनिक तरुण भारत आणि धेंम्पो चॅरिटीज ट्रस्टच्या श्रीनिवास सिनाय धेंपो महाविद्यालय, कुजिरा-बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ’घुमट गाज’ अखिल गोवा आंतर महाविद्यालयीन घुमट आरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद व इंडिक क्लबच्या सहकार्याने व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या पाठबळाने ही स्पर्धा शनिवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात होणार आहे. गोव्यातील गणेशोत्सवात सादर होणारी घुमट आरती ही संगीत, भक्तिरस आणि तालाचा सुंदर संगम आहे. घुमट, कसाळे, शामेल व गायक या घटकांच्या माध्यमातून पारंपरिक शैलीत सादर होणारी ही कला नव्या पिढीत ऊजविणे, स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणे आणि या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यास 15,000 रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकास 10,000 रुपये रोख व चषक, तर तृतीय क्रमांकास 7,000 रुपये रोख व चषक देण्यात येणार आहेत. उत्तेजनार्थ बक्षिसांत पहिल्या क्रमांकासाठी 3,000 रुपये व दुसऱ्या क्रमांकासाठी 2,000 रुपये रोख रक्कम दिली जाईल. तसेच घुमट, कसाळे, शामेल व गायक या प्रत्येक घटकातील उत्कृष्ट कलावंतास प्रत्येकी 1,000 रुपये रोख व चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धा फक्त गोव्यातील महाविद्यालयीन संघांसाठी खुली असून प्रत्येक संघात घुमट, कसाळे, शामेल व गायक या सर्व घटकांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. सादरीकरणाची वेळ कमाल 10 मिनिटे असेल. पारंपरिक वेशभूषा बंधनकारक असून कृत्रिम किंवा रेकॉर्डेड संगीत वापरण्यास सक्त मनाई आहे. सहभागाची नोंद स्पर्धेपूर्वी महाविद्यालयात करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही स्पर्धा गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात व महाविद्यालयीन युवकांमध्ये उत्साह व नवचैतन्य आणणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.









