यांत्रिकीकरणाचा वाढता प्रभाव, मजुरांचा अभाव कारणीभूत
काणकोण : जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरड्या राहिलेल्या काणकोण तालुक्यात पावसाने सध्या जोर धरला आहे. काणकोणात 1 रोजी साडेचार इंच इतक्या पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील मिरचीची लागवड पूर्ण झालेली असून भातशेतीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. एकेकाळी बैलांच्या जोडीच्या साहाय्याने करण्यात येणारी नांगरणी आता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. वाढत्या यांत्रिकीकरणाच्या प्रभावामुळे आणि मजुरांच्या अभावामुळे पारंपरिक पद्धतीने शेती या तालुक्यात हळूहळू बंद व्हायला लागली आहे. नांगरणीसाठी वापरली जाणारी बैलजोडी जे काम चार दिवसांत उरकत असे तेच काम एक ट्रॅक्टर एका दिवसात पूर्ण करत असला, तरी अजूनही गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील काही शेतकरी आपल्या शेतात बैलांच्या जोडीचा वापर करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंद्रावाडा, गावडोंगरी येथील तोळू गावकर अजूनही आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीचा वापर करत आहेत. नांगरणीसाठी आणि अन्य कामांसाठी ते बैलांचा वापर करतात. यांत्रिकीकरणाच्या वाढत्या प्रस्थामुळे, जनावरांची चराईची ठिकाणे राहिली नसल्याने आणि पारंपरिक गुराखी पद्धत बंद झाल्याने भटक्या जनावरांची संख्या वाढली असल्याचा निष्कर्ष आता काढला जात आहे. काणकोण तालुक्यात गुळे ते पोळे आणि चार रस्ता ते माशेपर्यंतच्या भागात सर्वत्र रस्त्यावर भटक्या गुरांचे कळप रवंथ करत असल्याचे चित्र वर्षाचे बाराही महिने पाहायला मिळते.
कांबळही लुप्त
दरम्यान, पावसापासून आणि हिवाळ्यात थंडीपासून बचाव करणारी शेतकऱ्यांचे पांघरूण असलेली कांबळ आता नाहिशी झालेली आहे. पूर्वी काणकोणातील विशेषत: गावडोंगरी, खोतीगाव या भागांतील शेतकरी माजाळी येथील शेट्टी यांच्या दुकानातून कांबळ खरेदी करण्यासाठी गर्दी करायचे. त्यानंतर चावडीवर यशवंत क्लोथ स्टोअर्सचे अजित पै यांनी कांबळ विकणे सुरू केले. मात्र मागच्या दहा-पंधरा वर्षांपासून कांबळीची जागा रेनकोटने घेतली आहे आणि कांबळीचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. पावसाळ्यात शेतीची कामे करताना कांबळ वापरात येण्याच्या पूर्वी, बोली भाषेत ज्याला ‘घुरम’ म्हटले जायचे, त्या ‘इरल्या’चा वापर केला जात असे. हे ‘इरले’ देखील याच भागातील शेतकरी वर्ग विणून देत असे. ही सर्व पारंपरिक साधने लुप्त होत गेली आहेत.









