प्रतिनिधी /पणजी
पाकशास्त्रात दिवसेंदिवस कितीही बदल झाले तरी त्या-त्या राज्यांतील पारंपरिक पदार्थ हेच आपल्या आरोग्याला सर्वश्रेष्ठ ठरतात. तेव्हा पालकांनी आपल्या मुलांना जंकफूडपासून दूर ठेवून आपल्या पूर्वजांनी आखून ठेवलेल्या पाककृतीच त्यांना रोजच द्यावा, ज्यामुळे आपली मुले नेहमीच निरोगी आणि सुदृढ राहतील, असे प्रतिपादन ‘रुच्चीक’ फेम अमिता नायक सलत्री यांनी केले.
दामादे, करासवाडा म्हापसा येथील किड्स पॅलेस पूर्व प्राथमिक विद्यालयामध्ये पालकांसाठी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत प्रमुख पाहुण्या आणि परीक्षक म्हणून अमिता सलत्री उपस्थित होत्या. या शाळेच्या प्रमुख संगीता हडफडकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचर करून दिला व स्वागत केले. सर्व विजेत्यांना सौ. सलत्री यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ः प्रथम अक्षता गांवकर, द्वितीय समिधा मोरजकर, तृतीय यमुना कुत्रे तर उत्तेजनार्थ प्रतीक्षा नाईक, सुषमा गांवकर, स्नेहा पेडणेकर व दिपिका नाईक.









