श्रावणाच्या तिसऱ्या शनिवारी श्री नृसिंह देवाची यात्रा मोठ्या उत्साहात भरते
शिरोळ : प्रत्येक गावची यात्रा म्हटले की एक विशिष्ट परंपरा गावांनी जपलेली असते. अशीच शेकडो वर्षाची परंपरा कुटवाड (ता. शिरोळ) येथील नृसिंह देवाची यात्रा शेकडो वर्षापासून गावाने जपली. यात्रेत सर्व महिला व पुरुष एकत्र येऊन मंदिरामध्येच पुरणपोळीचा नैवेद्य तयार करतात व नैवेद्य दाखवून सर्व गावासह शेकडो भाविकांना महाप्रसाद वाटप करतात. शनिवारी यात्रा उत्साहात पार पडली.
कुटवाड गावात अति प्राचीन स्वयंभू श्री नृसिंह देवाचे जागृत देवस्थान आहे. या देवालयात प्रत्येक वर्षी श्रावणाच्या तिसऱ्या शनिवारी श्री नृसिंह देवाची यात्रा मोठ्या उत्साहात भरते. या यात्रेचे वैशिष्ट्या म्हणजे सर्व गावातील नागरिक, महिला व माहेरवाशीन महिला एकत्र येऊन पुरणपोळीचा नैवद्य तयार करतात. देवाला नैवेद्य दाखवून सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेतात. शेकडो वर्षांची परंपरा आज ही या गावात जपली जाते.
श्रावण महिना लागताच पहिल्या सोमवारी गावात बैठक घेतली जाते व यात्रेच्या तयारीला सुरुवात होते. गावातून वर्गणी गोळा करून सुमारे अडीचशे किलो डाळ, अडीचशे किलो गूळ 400 किलो तांदूळ व साडेचारशे किलो गव्हाचे पीठ या महाप्रसादाला लागणारा साहित्य व यात्रेसाठी लागणारा खर्च केला जातो.
दिवसभर श्री नृसिंह देवालयाच्या परिसरात नैवेद्य तयार करण्यासाठी संपूर्ण गावातील महिला व माहेरवाशिन महिला एकत्र येतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत पुरण पोळी, भात व आमटी हा नैवेद्य तयार करण्यासाठी शेकडो हात राबत असतात. सायंकाळी पाच वा. श्री नृसिंह देवाची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येते. पालखी मंदिरात आल्यानंतर आरतीनंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते.
या महाप्रसादासाठी कुटवाडसह पंचक्रोशीतील शिरोळ, कनवाड, घालवाड, अर्जुनवाड या भागातील नागरिक व पाहुणे मोठ्या संख्येने यात्रेला येतात. या अनोख्या पुरणपोळीच्या नैवेद्याचा प्रसाद घेऊन यात्रा उत्साहात होते. यावर्षी ही श्रावणाच्या तिसऱ्या शनिवारी (दि. 9) यात्रा मोठ्या उत्साहात झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
एकत्र आल्याने एकात्मतेचे बंध आणखीन घट्ट
“शेकडो वर्षांपासून कुटवाड गावात ही परंपरा सुरू आहे. सर्व महिला एकत्र येऊन पुरणपोळीचा नैवेद्य तयार करतात. यात्रेमुळे गावातील महिला व नागरिक एकत्र आल्याने एकात्मतेचे बंध आणखीन घट्ट होतात. गावातील शांतता व सलोखा कायम राहते.”
– परशराम पाटील, अध्यक्ष, नृसिंह देवालय समिती, कुटवाड.








