आरपीडी चौक दुसरा क्रॉस येथील प्रकार, महापालिकेचा अनागोंदी कारभार
बेळगाव : आरपीडी चौक दुसरा क्रॉस, खानापूर रोड येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबत आहे. या पाण्यातूनच भाग्यनगरच्या नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. तसेच आजू बाजूच्या व्यापाऱ्यांना या समस्येचा फटका बसत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारी नसल्यामुळे मुख्य रस्त्यावरच पाणी साचत आहे. अनेकवेळा तक्रारी करून देखील पाण्याचा निचरा करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागील महिन्यात येथील रस्त्याच्या निम्म्या भागातील पेव्हर्स बदलण्यात आले. परंतु ते का बदलले? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. संबंिधत ठेकेदारांनीही उत्तर देणे टाळले. त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार सुरू आहे. हा परिसर उपमहापौरांच्या वॉर्डमध्ये येत असल्याने त्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. साचलेल्या पाण्यामधून वाहने वेगाने निघून गेल्यास आसपासच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी उडून नुकसान होत आहे. महापालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारींचे बांधकाम करून रस्त्यांची उंची वाढविल्यास ही समस्या कायमची सुटणार आहे.









