जय किसान भाजी मार्केटमधील परिस्थिती
बेळगाव : जय किसान भाजी मार्केट येथे पैसे भरून देखील अनेकांना अद्याप गाळे मिळालेले नाहीत. काहींना अशा ठिकाणी गाळे देण्यात आले आहेत, ज्या ठिकाणी व्यापार होणे अशक्य आहे. तसेच विद्यमान संचालकांकडून कोणताही हिशेब देण्यात आलेला नाही, असा आरोप जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी फकिरा गुडाजी यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. सध्या एपीएमसी व जय किसान भाजी मार्केटमध्ये वाद सुरू आहे. दोन भाजी मार्केटच्या वादामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दोन्ही मार्केट चालावीत, अशी भावना असताना जय किसान भाजी मार्केट येथे व्यापाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे.
पैसे घेऊन दुकानगाळे तर देण्यात आले. परंतु अद्याप मंजुरीचे पत्र व्यापाऱ्यांना देण्यात आलेले नाही. एपीएमसी कायद्यांतर्गत अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत. काही संचालकांनी दोन-दोन दुकानगाळे घेतले असून त्यातील काही भाड्याने दिली आहेत. एकीकडे व्यापाऱ्यांना दुकानगाळे नाहीत तर दुसरीकडे दुकानगाळे भाड्याने दिले जात असल्याने या सर्व प्रकरणांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. बेळगावमधील भाजी मार्केटच्या गोंधळामुळे शेतकरी संकेश्वर, हुबळी, निपाणी या भाजी मार्केटकडे वळला आहे. यामुळे प्रशासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेवेळी सुचेता गजानन पावशे, डी. एम. नेसरगी, कृष्णा देसाई यांच्यासह इतर उपस्थित होते.









