महानगरपालिकेत कैफियत मांडून बाहेर पडताच हृदयविकाराचा झटका
बेळगाव : जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी शुक्रवारी दुपारी महापौर व मनपा आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेत गेले होते. त्या ठिकाणी आपली कैफियत मांडून व्यापारी महापौर कक्षातून बाहेर आले. तितक्मयात इस्माईल मुजावर (वय 45) रा. वडगाव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने नजीकच्या एका खासगी डॉक्टरकडे दाखविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नेहरुनगर येथील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या जय किसान भाजी मार्केटचा लँड युज बदल आपोआप रद्द झाल्याचा आदेश बुडा आयुक्तांनी नुकताच जरी केला आहे. त्यामुळे कोट्यावधी ऊपये गुंतवून गाळे घेतलेल्या व्यापाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुडाने ज्याप्रमाणे जय किसान भाजी मार्केटवर अन्याय केला आहे त्याप्रमाणे मनपाने करू नये, कोणतीही कारवाई करताना व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे,
या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी 12 च्या दरम्यान जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी महापौर मंगेश पवार व मनपा आयुक्त शुभा बी. यांची भेट घेण्यासाठी महापालिकेत गेले होते. 2 च्या दरम्यान महापौरांच्या कक्षातून बाहेर पडल्यानंतर इस्माईल यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना एका खासगी डॉक्टरांकडे दाखविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नेहरुनगर येथील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
इस्माईल यांचा जय किसान भाजी मार्केटमध्ये 43 नंबरचा गाळा होता. सदर गाळा घेण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम गुंतविली होती. मात्र भाजी मार्केट बंद पडणार या भीतीमुळेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी तथा नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी सांगितले.









