पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन : दोन्ही देशांदरम्यान 3 विकास प्रकल्पांचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी बुधवारी तीन विकासप्रकल्पांचे व्हर्च्युअली उद्घाटन केले आहे. भारत-बांगलादेशला जोडणारे दोन रेल्वे प्रकल्प-अखौरा-अगरतळा क्रॉस बॉर्डर लिंक, मोंगला पोर्ट रेल्वे लाइनचा यात समावेश आहे. याचबरोबर मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लॅन्टच्या युनिट-दोनचेही उद्घाटन करण्यात आले आहे.
मागील 9 वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार तीनपट झाला आहे. अखौरा-अगरतळा रेल्वेप्रकल्प हा भारतातील ईशान्येची राज्ये आणि बांगलादेशदरम्यान पहिला रेल्वेमार्ग आहे. याचे उद्घाटन एक ऐतिहासिक क्षण असून मागील 9 वर्षांमध्ये आम्ही मिळून जितके काम केले, तितके अनेक दशकांमध्ये झाले नव्हते. मुक्ती संग्रामच्या काळापासूनच त्रिपुराचे बांगलादेशसाब्sात दृढ नाते राहिले आहेत. मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या युनिटचे उद्घाटन करण्यात आल्याने मी आनंदी असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भारत-बांगलादेश दरम्यान तिन्ही प्रकल्पांचे संयुक्त उद्घाटन आमची पक्की मैत्री आणि सहकार्य दर्शविते. दोन्ही देशांदरम्यान मैत्री मजबूत करण्यावरून भारताचे पंतप्रधान मोदी यांची प्रतिबद्धता प्रशंसनीय असल्याचे उद्गार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी काढले आहेत.
या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी आणि शेख हसिना यांनी संयुक्त स्वरुपात तीन प्रकल्पांचे उdदघाटन केले असून यातील बांगलादेशच्या मैत्री सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी भारताने 1.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 1320 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प भारताच्या एनटीपीसी लिमिटेड आणि बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाकडून पूर्ण करण्यात आला आहे.
नव्या रेल्वेमार्गामुळे व्यापार वाढणार
क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रकल्पाचे उdदघाटन झाल्याने दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी मजबूत होणार आहेत. रेल्वेच्या दोन प्रकल्पांपेकी अगरतळा-अखौरा रेल्वेमार्ग 15 किलोमीटर लांबीच आहे. यातील 5 किलोमीटर रेल्वेमार्ग भारतात आहे. सद्यकाळात अगरतळा येथून कोलकाता येथे रेल्वेने पोहोचण्यास 31 तास लागतात. परंतु या प्रकल्पामुळे 10 तासांचा वेळ वाचणार आहे. भारतीय रेल्वेने या प्रकल्पाकरता 153.94 कोटी रुपयांचा निधी दिला. तर भारत सरकारने 392.52 कोटी रुपयांची मदत बांगलादेशला केली आहे. अशाचप्रकारे खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे मार्ग भारत सरकारच्या आर्थिक सहाय्याद्वारे तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात मोंगला बंदर आणि खुलना येथील रेल्वेमार्गादरम्यान सुमारे 65 किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे.
भारत-बांगलादेश डिझेल पाइपलाइन
7 महिन्यांपूर्वी मार्चमध्ये पंतप्रधान मोदी आणि शेख हसिना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत-बांगलादेश डिझेल पाइपलाइनचे उद्घाटन केले होते. 130 किलोमीटर लांबीची ही पाइपलाइन 377 कोटी रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही पहिली ऊर्जा पाइपलाइन आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य वाढले आहे.









