विविध मागण्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन
खानापूर : देशभरातील कामगारानी पुकारलेल्या कामबंद आंदोलनात खानापूर तालुका कामगार संघटनानी पाठिंबा जाहीर केला असून, बुधवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून आपल्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. उपतहसीलदार राकेश बुवा यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण वरिष्ठांकडे निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व मेघा मिठारी, भारती पै, सरिता पेडणेकर, अनिता पाटील, सुजाता चलवादी, लता पाटील, ज्योती बोबटे यांनी केले. आंदोलनात अंगणवाडी सेविका, साहाय्यक आणि विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.
सुरवातीला बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. राजा छत्रपती चौकातील शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून तहसीलदार कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले. यात अंगणवाडी सेविका आणि साहाय्यक यांना सेवेच्या सर्व शासकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, तसेच कामगाराना सुविधांची शासकीय सुरक्षा देण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.









